नशीबवान स्पेनच्या आशा कायम

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणविरुद्धच्या लढतीत नशीब स्पेनच्याच बाजूने होते. केवळ नशिबाची साथ मिळाल्यानेच स्पेनला या सामन्यात विजयाचा चेहरा पाहता आला. हा सामना 1-0 असा जिंकून त्यांनी बाद फेरीचे आपले आव्हान कायम ठेवले.

कझान (रशिया), ता. 21 ः विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणविरुद्धच्या लढतीत नशीब स्पेनच्याच बाजूने होते. केवळ नशिबाची साथ मिळाल्यानेच स्पेनला या सामन्यात विजयाचा चेहरा पाहता आला. हा सामना 1-0 असा जिंकून त्यांनी बाद फेरीचे आपले आव्हान कायम ठेवले.
पोर्तुगालविरुद्ध पहिल्या सामन्यात दोन गोल करणाऱ्या दिएगो कोस्टानेच स्पेनचा एकमात्र गोल केला. अर्थात, यात नशिबाचा भाग अधिक होता. स्पेनच्या आक्रमकांना इराणच्या बचावफळीने मैदानातच नाही, तर गोलकक्षातही मोकळे सोडले नव्हते. अशाच एका क्षणी इराणच्या गोल कक्षात मुसंडी मारल्यानंतर इनिएस्टाने चेंडू गोलपोस्टच्या समोर असलेल्या कोस्टाकडे दिला होता. मध्ये इराणच्या बचावपटूने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बचावपटूने जखडून ठेवलेल्या कोस्टाला फिरण्यास संधी नव्हती. पण, नशीब इतके बलवत्तर की चेंडू त्याच्या पायाला लागून गोलपोस्टमध्ये गेला. इराणचा गोलरक्षक अली बेईरानवांडदेखील चक्रावून गेला.
त्यानंतर अखेरच्या टप्प्यात सईद इझाटोलाहीने स्पेनवर गोल केल्यामुळे मैदानातील खेळाडूंसह राखीव खेळाडूही या गोलच्या जल्लोषात सहभागी झाले होते. प्रेक्षकांमधूनही इराणचे चाहते अखंडपणे वुवुझेला वाजवण्यात दंग होते. पण, "वार'चा उपयोग करून पंचांनी "ऑफसाइड'चा निर्णय देत हा गोल फेटाळून लावला आणि या सर्वांच्या उत्साहावर पाणी फिरले.
इराणचा बचाव भेदण्यासाठी ऐनवेळी करावे लागणाऱ्या नियोजनातच स्पेनचा पूर्वार्धातील बराचसा वेळ खर्ची गेला. स्पेन आपल्या नेहमीच्या छोट्या पासने खेळत इराणच्या गोलकक्षात मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी इराणचे प्रमुख खेळाडू मध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. तर, बॅकला एकवेळ इराणच्या सहा खेळाडूंची भिंतच स्पेनच्या आक्रमकांसाठी अडथळा ठरत होती. या सहा जणांत इतका समन्वय होतो की स्पेनचे आक्रमक जसे पुढे किंवा बाजूला सरकत होते तसे हे सहा बचावपटू एका लयीत पुढे मागे जात होते.
उत्तरार्धात स्पेनचे खेळाडू अधिक स्थिरावलेले वाटले. इराणच्या बचावफळीला भेदण्याचा विश्‍वास त्यांच्या देहबोलीत दिसून येत होता. छोट्या पासला बगल देत काही वेळेस स्पेनने खोलवर पास देण्यास सुरवात केली. त्यामुळे इराणच्याही बचावपटूंना आपले नियोजन बदलणे भाग पडले. गोलरक्षक बोईरानवांड याच्या क्षमतेची कसोटीही लागली.
"ब' गटाचे दोन सामने झाले असले, तरी बाद फेरीचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. पोर्तुगाल, स्पेनचे प्रत्येकी चार गुण आहेत. मोरोक्कोचे आव्हान संपले असले, तरी अखेरच्या सामन्यात स्पेन आणि पोर्तुगालचा पराभव झाल्यास चित्र बदलू शकते. त्यामुळे इराणही अजून शर्यतीत आहे असे म्हणता येईल.
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spain still have hopes to qualify