रेआल माद्रिद, बार्सिलोनाचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 April 2017

माद्रिद - स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रेआल माद्रिद आणि बार्सिलोना संघांनी 29 व्या साखळी सामन्यात विजय मिळवून अनुक्रमे आपले पहिले आणि दुसरे स्थान कायम ठेवले. या दोघांमध्ये आता केवळ दोन गुणांचे अंतर आहे.

माद्रिद - स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रेआल माद्रिद आणि बार्सिलोना संघांनी 29 व्या साखळी सामन्यात विजय मिळवून अनुक्रमे आपले पहिले आणि दुसरे स्थान कायम ठेवले. या दोघांमध्ये आता केवळ दोन गुणांचे अंतर आहे.

अल्वेस संघाला पराभूत करण्यासाठी रेआल माद्रिदची सुरवातीला दमछाक झाली; परंतु त्यांनी अखेर 3-0 असा विजय मिळविला. लिओनेल मेस्सीशिवाय खेळणाऱ्या बार्सिलोनाने ग्रॅनडा संघाचा 4-1 असा धुव्वा उडवला.

करिम बेन्झेमाने सामन्यातला पहिला गोल करून रेआल माद्रिदचे खाते उघडले त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी अल्वेस संघाला संधी मिळाली होती. उत्तरार्धात इस्तो आणि नॅचो फर्नांडिस यांनी गोल करून रेआलची आघाडी 3-0 अशी केली. अल्वेसचा गोलरक्षक फर्नांडो पाचेकोने तीन गोल स्वीकारताना दोनदा अप्रतिम गोलरक्षण केले; परंतु त्यांच्या आक्रमक खेळाडूंनी संधी मिळूनही रेआलच्या गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही.

मेस्सी आणि गेराल्ड पिके यांच्याशिवाय खेळणाऱ्या बार्सिलोनाने पहिल्या अर्धात वर्चस्व राखले; परंतु पहिल्या गोलासाठी त्यांना 44 व्या मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागली. हा गोल सुआरेझने केला. पाच मिनिटानंतर जेरॉमी बोगाने ग्रॅनडाला बरोबरी साधणारा गोल करून दिला आणि सामन्यात रंग भरण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र 15 मिनिटांनंतर पाको अल्कॅसरने गोल केला. उचे अग्बोला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे त्याला बाहेर जावे लागले; परंतु, त्याअगोदर त्याने स्वयंगोल केला आणि बार्सिलोनाच्या खात्यात आणखी एक गोल वाढला. भरपाई वेळात नेमारने गोल करून बार्सिलोनाच्या विजयावर 4-1 असे शिक्कामोर्तब केले.

आर्सनेल-सिटी बरोबरी
दरम्यान, इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये आर्सनेल आणि मॅंचेस्टर सिटी सामना 2-2 बरोबरीत सुटला. सलग तिसरा पराभव रोखण्यासाठी आर्सनेलने पिछाडीवरून बरोबरी साधली. संघाची खराब कामगिरी होत असल्यामुळे आर्सनेलचे प्रेक्षक प्रशिक्षक वॅग्नर यांच्यावर नाराज आहेच. सामना संपल्यानंतर या प्रेक्षकांनी वॅग्नर यांनी राजीनामा देण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर घोषणाबाजी केली. आर्सनेल सहाव्या क्रमांकावर आहे; तर सिटीने चौथा क्रमांक कायम ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spanish league football competition