ब्राव्हो चिलीच्या विजयाचा शिल्पकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 June 2017

सलग तीन पेनल्टी रोखत विजय साकारला

कझान - चिली गोलरक्षक क्‍लॉडिओ ब्राव्हो याने सलग तीन पेनल्टी रोखत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला हार मानण्यास भाग पाडले. त्यामुळे चिलीने ३-० अशी बाजी मारत कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेच्या पदार्पणातच अंतिम फेरीत धडक मारली. 

सलग तीन पेनल्टी रोखत विजय साकारला

कझान - चिली गोलरक्षक क्‍लॉडिओ ब्राव्हो याने सलग तीन पेनल्टी रोखत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला हार मानण्यास भाग पाडले. त्यामुळे चिलीने ३-० अशी बाजी मारत कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेच्या पदार्पणातच अंतिम फेरीत धडक मारली. 

ब्राव्होने रिकार्डो क्वारेस्मा, जोआ मॉटिन्हो आणि नॅनी यांच्या पेनल्टी रोखल्या, त्यामुळे दक्षिण अमेरिकन विजेत्यांनी युरोपिय विजेत्यांना परास्त केले. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो शूटआउटमध्ये कायम अखेरची पाचवी पेनल्टी घेतो, पण त्याला ही संधीच मिळाली नाही. २०१२ च्या युरो स्पर्धेतील स्पेनविरुद्धच्या लढतीतही हेच घडले होते. चिलीचा या विजयावर हक्कच होता. अखेरच्या मिनिटात त्यांचे दोन गोल थोडक्‍यात हुकले होते. त्यांच्या झुंजार कामगिरीस अखेर विजयाचे कोंदण दिले. या लढतीत निर्धारित वेळेनंतर गोलशून्य बरोबरी होती. 

चिलीला पंचांनी निर्धारित वेळेत पेनल्टी नाकारली होती. ते जिंकल्यामुळे त्यांना न्याय मिळाला, अशीच भावना होती. पोर्तुगालचा बचावपटू जोस फाँटे याने गोलक्षेत्रात चिलीचा विंगर ॲलेक्‍सिस सॅंचेझ याला अवैधरीत्या रोखले असल्याचे सर्वांचेच मत झाले, पण रेफरी सहमत झाले नाहीत. त्यांनी व्हिडिओ असिस्टंट रेफरींची मदत घेण्यासही नकार दिला. 

ब्राव्हो या विजयाचा शिल्पकार ठरला. मॅंचेस्टर सिटीच्या या गोलीवर तेथील चाहत्यांनी जास्त गोल झाल्याबद्दल टीका केली, पण राष्ट्रीय संघाकडून खेळताना त्याने कामगिरी उंचावली. त्याने निर्धारित वेळेत रोनाल्डो, तसेच सहकाऱ्यांची आक्रमणे रोखून धरण्यात मोलाची कामगिरी बजावली. क्‍लॉडिओ तसेच गोलरक्षक मार्गदर्शकांनी पोर्तुगालच्या खेळाडूंचा चांगला अभ्यास केला होता. त्यांची योजना यशस्वी ठरली, त्याबद्दल ते कौतुकासच पात्र आहेत, असे सांगताना चिली मार्गदर्शक जुआन अंतानिओ पिझ्झी यांनी आमचा खेळ विजेत्यास साजेसाच होता, असे आवर्जून सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Bravo Sculptor of chile victory