esakal | रेयाल माद्रिदचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

रोटेरडॅम (नेदरलँड) - चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मॅंचेस्टर सिटीच्या गॅब्रिएल जेऊस याने हेडरद्वारे चेंडूला दिशा देण्यासाठी, तर फेईनूर्डचा गोलरक्षक ब्राड जोन्स याने चेंडू अडवण्यासाठी अशी हवेत उडी मारली.

रेयाल माद्रिदचा विजय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माद्रिद - बंदी उठल्यावर मैदानात उतरणाऱ्या रोनाल्डोच्या कामगिरीने चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिदने विजयी सुरवात केली. त्याचवेळी रोटेरडॅम येथील सामन्यात मॅंचेस्टर सिटीने वेगवान खेळ करत फेईनूर्ड क्‍लबला निष्प्रभ केले. टॉट्टेनहॅमने बोरुसिया डॉर्टमुंडला हरवले. लिव्हरपूलला सेव्हिलाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. 

पंचांना ढकलल्यावरून घालण्यात आलेली बंदी उठल्यानंतर ख्रिस्तिआनो रोनाल्डो याने रेयाल माद्रिदला स्पॅनिश लीगमध्ये आपली उणीव भासली हे सिद्ध करण्याची वेळ दवडली नाही. सामन्याच्या १२व्या मिनिटाचा त्याने गॅरेथ बेलच्या पासवर गोल करून रेयालचा धडाका सुरू केला. त्यानंतर पेनल्टीवर त्याने आपला दुसरा गोल केला, तर सर्गिओ रामोसने आणखी एक गोल करून रेयाल माद्रिदच्या ॲपोएल निकोसियावरील ३-० विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाने रेयालने ‘एच’ गटातून टॉटेनहॅम हॉट्‌सपूर संघासह आघाडीचे स्थान मिळविले. टॉटेनहमने अन्य एका सामन्यात बोरुसिआ डॉर्टमुंड संघावर ३-१ असा विजय मिळविला. ऑफसाइड ठरल्यामुळे रोनाल्डोची चॅंपियन्स लीगमधील आठवी हॅट्ट्रिक होऊ शकली नाही. 

ॲग्युएरोचे अर्धशतक
रोटेरडॅम येथे झालेल्या चॅंपियन्स लीगमधील आणखी एका सामन्यात मॅंचेस्टर सिटी संघाने फेईनूर्डला ४-० असे सहज पराभूत केले. या सामन्यात त्यांच्या जे स्टोन्स याने दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला असला, तरी ॲग्युरो याचा गोल अधिक चर्चेत राहिला. त्याने हा गोल करून युरोपियन क्‍लब स्पर्धेतील वैयक्तिक गोलचे अर्धशतक पूर्ण केले. काईल वॉकरच्या पासवर त्याने हा गोल केला. मॅंचेस्टरची सुरवात इतकी वेगवान होती, की त्यांनी सामन्याच्या पहिल्या २५ मिनिटांतच तीन गोल केले. त्यांच्या या धडाक्‍यासमोर फेईनूर्ड साफ निष्प्रभ ठरले. त्यांना डोके वर काढण्याची संधीच मिळाली नाही. 
 

अन्य निकाल -
     लिव्हरपूल २ (रॉबर्टो फिर्मिनो, महंमद सालेह) बरोबरी वि. सेव्हिला २ (वसॅम बेन येड्डेर, कॉरेआ), 
     मॅंचेस्टर सिटी ४ (जे. स्टोन्स (२), सर्गिओ ॲग्युएरो, गॅब्रिएल जेऊस) वि. वि. फेईनूर्ड, 
     टॉट्टेनहॅम हॉट्‌सपूर ३ (हेऊंग मिन सोन, एच. केन (२)) वि. वि. बोरुसिया डॉर्टमुंड १(ए. यार्मोलेन्को)
     मरिबॉर (डी. बोहार) १ बरोबरी वि. स्पार्टक मोस्कवा (ए. सॅमेडोव) १
     बेसिकटास (टालिस्का, सी. सोसुन, आर. बाबेल) ३ वि. वि. पोर्टो (डी. टोसिक)
     आरबी लीपझिग (फॉर्सबर्ग) १ बरोबरी वि. मोनॅको (टिएलेमान्स) १
     शख्तार डोनेंटस्क (टायसन, फेरेयरा) २ वि. वि. नापोली (मिलिक) १

loading image