उपांत्य लढत गुवाहाटीऐवजी कोलकत्यात

पीटीआय
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई / नवी दिल्ली - विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील आतापर्यंतच्या आयोजनाला सोमवारी काळा डाग लागला. मुसळधार पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य नसल्याचा हवाला देत जागतिक फुटबॉल महासंघाने  ब्राझील-इंग्लंड यांच्यातील उपांत्य लढत कोलकता येथे खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी लढत काही झाले तरी गुवाहाटीतच होईल, असे स्पष्ट केले होता. मात्र, काही तासांतच ‘फिफा’ने ही लढत कोलकत्यात हलविण्याचा निर्णय घेतला. 

गुवाहाटीतील इंदिरा गांधी स्टेडियमवरील माली - घाना लढतीच्या वेळी खूपच पाऊस झाला होता. त्यामुळे मैदान अनेक ठिकाणी उखडले गेले होते. तेव्हापासूनच ही लढत गुवाहाटीऐवजी कोलकत्यात होणार असल्याची चर्चा सुरू होती. स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख प्रफुल पटेल यांनी ही लढत गुवाहाटीतच होईल, फिफाचे पथक मैदान उपांत्य लढतीसाठी योग्य स्थितीत आणेल, अशी ग्वाही शनिवारी दिली होती असे वृत्त आहे. गुवाहाटीतील ड्रेनेज व्यवस्था चांगली आहे, त्यामुळे लढत अन्यत्र हलवण्याचा प्रश्‍नच येत नाही असे सांगितले जात होते.

दरम्यान, आज दुपारपासून ही लढत कोलकत्यास होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली; मात्र ब्राझीलचा संघ आजच सकाळी कोलकत्याहून गुवाहाटीस रवाना झाल्यामुळे कोणालाही यात तथ्य वाटत नव्हते. फिफाच्या पाहणी पथकाने यापूर्वीच येथील स्टेडियमचा दर्जा उच्च असल्याचे सांगितले होते; पण अखेर इंग्लंडने लढतीचे ठिकाण बदलण्यास फिफास भाग पाडले असल्याची चर्चा आहे. मैदान खेळण्यायोग्य होणार नसल्यामुळेच ही लढत गुवाहाटीहून कोलकात्यास होत असल्याचे जागतिक फुटबॉल महासंघाने कळवले आहे.

इंग्लंड संघाने गुवाहाटीतील मैदानाची स्थिती पाहून तिथे खेळणे धोकादायक ठरेल, असा आक्षेप घेतला. त्या संदर्भात झालेल्या बैठकीत इंग्लंडने सातत्याने हाच मुद्दा मांडला. इंग्लंड संघव्यवस्थापनाने पाऊस होत असताना अनेकदा चेंडू जागीच थांबला असल्याचे लक्षात आणून दिले. खरे तर ही लढत जोरदार पावसामुळे लांबणीवर टाकणे योग्य ठरले असते, या माली मार्गदर्शकांच्या टिप्पणीकडे सातत्याने लक्ष वेधले जात होते. 

कोचीच्या स्टेडियममधून बॉलची चोरी?
स्पेन आणि इराण यांच्यातील लढत झाल्यानंतर काही तासांतच सरावासाठी असलेले चेंडू आणि रेफरींसोबत असलेल्या साहित्याची स्टेडियममध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आल्याचे वृत्त आहे. कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील हा प्रकार लक्षात आल्यावर तेथील प्रत्येक स्वयंसेवकांची आज कसून चौकशी करण्यात आली. चोरीस गेलेल्या काही गोष्टी रविवारीच हाती लागल्याचे समजते. संयोजन समिती तसेच सुरक्षा आधिकारी मैदानावरील सर्व सीसी टीव्ही फुटेज बघत आहेत. त्यामुळे दोषींचा शोध लागण्यास जास्त वेळ लागणार नाही, असे सांगितले जात आहे.

Web Title: sports news football