नेमार चमकदार, पीएसजी दमदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

ग्लासगो - सेल्टिकला घरच्या मैदानावर सर्वांत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नेमारने जगातील सर्वाधिक बहुमोल फुटबॉलपटूचा लौकिक सार्थ ठरविल्यामुळे पॅरिस सेंट-जर्मेनने (पीएसजी) सेल्टीक पार्कवर पाच गोलांचा पाऊस पाडला. नेमारने खाते उघडल्यानंतर दुसऱ्या गोलमध्येही योगदान दिले. सेल्टीकला यानंतर आणखी धक्के बसले. पेनल्टीवर गोल झाल्यानंतर त्यांना स्वयंगोलही पत्करावा लागला. एडीन्सन कॅव्हानी याने पेनल्टी सत्कारणी लावली. याशिवाय त्याने झेप टाकत हेडींगवर अफलातून गोल केला. पूर्वार्धातच पेनल्टीवर तिसरा गोल झाल्यानंतर सेल्टीकची पीछेहाट नक्की झाली. 

ग्लासगो - सेल्टिकला घरच्या मैदानावर सर्वांत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नेमारने जगातील सर्वाधिक बहुमोल फुटबॉलपटूचा लौकिक सार्थ ठरविल्यामुळे पॅरिस सेंट-जर्मेनने (पीएसजी) सेल्टीक पार्कवर पाच गोलांचा पाऊस पाडला. नेमारने खाते उघडल्यानंतर दुसऱ्या गोलमध्येही योगदान दिले. सेल्टीकला यानंतर आणखी धक्के बसले. पेनल्टीवर गोल झाल्यानंतर त्यांना स्वयंगोलही पत्करावा लागला. एडीन्सन कॅव्हानी याने पेनल्टी सत्कारणी लावली. याशिवाय त्याने झेप टाकत हेडींगवर अफलातून गोल केला. पूर्वार्धातच पेनल्टीवर तिसरा गोल झाल्यानंतर सेल्टीकची पीछेहाट नक्की झाली. 

मेस्सीमुळे बार्सिलोना विजयी
बार्सिलोना - चँपियन्स लीगच्या मोसमास मातब्बर संघांच्या विजयाने सुरवात झाली. मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोना सरस ठरली, तर नेमारच्या कामगिरीने पीएसजीने बाजी मारली. चेल्सीने दणकेबाज पुनरागमन करताना सलामीलाच सहा गोल नोंदवले. मँचेस्टर युनायटेडनेही सहज विजय नोंदवला. 

लिओनेल मेस्सीच्या जादूई कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने गतउपविजेत्या युव्हेंट्‌सला हरविले. मेस्सीने दोन गोलांचे योगदान दिले व एका गोलची चाल रचली. बार्सिलोनाला गेल्या मोसमात युव्हेंट्‌सने उपांत्यपूर्व फेरीत ‘बाद’ केले होते. त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.

युव्हेंट्‌सने चिवट खेळ केला होता, पण मेस्सीने मध्यंतरास काही सेकंद बाकी असताना खाते उघडले.  मग मेस्सीच्या धडाक्‍यासमोर युव्हेंट्‌सचा बचाव खिळखिळा झाला. याचा फायदा घेत इव्हान रॅकिटीचने गोल केला. त्यानंतर आंद्रेस इनिएस्टाच्या पासवर मेस्सीने पुन्हा लक्ष्य साधले. 

रॅशफोर्डचे दमदार पदार्पण
मॅंचेस्टर - संभाव्य विजेत्या मॅंचेस्टर युनायटेडने बॅसलला सहज हरवून ओल्ड ट्रॅफर्डवर आपल्या मोहिमेची यशस्वी सुरवात केली. १९ वर्षांचा खेळाडू मार्कस रॅशफोर्ड याची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. महत्त्वाच्या स्पर्धांत पदार्पणात गोल करण्याची विलक्षण क्षमता त्याने पुन्हा प्रदर्शित केली. बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरल्यानंतर त्याने सात मिनिटांत गोल केला. त्याने सहा मिनिटे बाकी असताना गोल केला. 

चेल्सीचा पुनरागमनात षटकार
लंडन - चेल्सीवर गेल्या मोसमात चॅंपियन्स लीगला अपात्र ठरण्याची नामुष्की ओढवली होती. या वेळी पुनरागमन करताना चेल्सीने क्‍युराबाग संघाविरुद्ध सहा गोलांचा पाऊस पाडला. त्यामुळे घरच्या मैदानावर चेल्सीचे चाहते खूष झाले. यात डेव्हिड झॅप्पाकोस्टा याने केलेला गोल नेत्रदीपक ठरला. मिची बात्शुयायी याने दोन गोल केले. अझरबैजानच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध चेल्सीने काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यानंतरही इतका दमदार विजय कौतुकास्पद ठरला. पेड्रोने २० यार्डवरून खाते उघडले. झॅप्पाकोस्टाने प्रथमच खेळताना उजव्या बाजूने ५० यार्ड अंतर धावत तिरकस चेंडू मारत प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविले.

निकाल
 बार्सिलोना ३ (लिओनेल मेस्सी ४५, ४९, रॅकिटीच ५६) विवि युव्हेंट्‌स ०
 मॅंचेस्टर युनायटेड ३ (फेलियानी ३५, लुकाकू ५३, रॅशफोर्ड ८४) विवि एफसी बॅसल ०
 बायर्न म्युनिक ३ (रॉबर्ट लेवंडोस्की १२-पेनल्टी, थियागो अल्कॅंटारा ६५, किमीच ९०) विवि आरएससी अँडरलेक्‍ट (कुम्स ११)
  चेल्सी ६ (पेड्रो ५, झॅप्पाकोस्टा ३०, अझ्पीलीक्‍युएटा ५५, बाकायोको ७१, बात्शुयायी ७६, मेडवेडेव ८२-स्वंयगोल)  विवि एफके क्‍युराबाग
 सेल्टीक ० पराभूत वि. पॅरीस सेंट जर्मेन ५ ( नेमार १९, एम्बापे ३४, कॅव्हानी ४०-पेनल्टी, ८५, लुस्टीग ८३-स्वयंगोल)
इतर निकाल
बेनफिका १ पराभूत विरुद्ध सीएसकेए मॉस्को २. रोमा ० वि. ॲटलेटीको माद्रिद ०.
ऑलिंपियाकोस २ पराभूत वि. स्पोर्टींग लिस्बन ३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football competition