esakal | भारताचा एक फुटबॉलपटू अधिक वयाचा आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

भारताचा एक फुटबॉलपटू अधिक वयाचा आढळला

भारताचा एक फुटबॉलपटू अधिक वयाचा आढळला

sakal_logo
By
पीटीआय

पणजी - ‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी निवडलेल्या संभाव्य खेळाडूंपैकी एक खेळाडू अधिक वयाचा ठरल्यामुळे भारतीय संघाच्या तयारीला नक्कीच हादरा बसला आहे. संघ जाहीर करण्यापूर्वी दोन दिवस आधी घेण्यात आलेल्या एमआरआय चाचणीत हा खेळाडू अधिक वयाचा असल्याचे स्पष्ट झाले. संघव्यवस्थापन आणि भारतीय फुटबॉल महासंघाने या खेळाडूच्या नावाविषयी कमालीची गुप्तता बाळगली आहे.  भारतीय प्रशिक्षक लुईस नॉर्टन द मातोस यांनी त्या संबंधित खेळाडूस संघातून वगळले आहे. विशेष म्हणजे भारतीय फुटबॉल महासंघाने सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या अशा प्रकारच्या एमआरआय चाचणीत हाच खेळाडू १७ वर्षांखालील असल्याचा अहवाल देण्यात आला होता. 

प्रशिक्षक नॉर्टन द मातोस यांनी भारताचा संघ २१ सप्टेंबरला रात्री जाहीर केला. त्यापूर्वी दोन दिवसअगोदर सर्व संभाव्य खेळाडूंची वयनिश्‍चितीसाठी एमआरआय चाचणी घेण्यात आली होती. संघनिवडीपूर्वी अहवाल आल्यानंतर फक्त एका खेळाडूचा अपवाद वगळता इतर खेळाडू १७ वर्षांखालील स्पर्धेसाठी पात्र होते.

एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, एमआरआय चाचणीत खेळाडूच्या मनगटाची पूर्ण वाढ आढळली. डॉक्‍टरांच्या अहवालानुसार त्या खेळाडूची सहाव्या श्रेणीत नोंद झाली, त्यामुळे ‘फिफा’ नियमावलीनुसार तो १७ पेक्षा जास्त वयाचा ठरला. जन्मतारखेनुसार खेळाडू १ जानेवारी २००० रोजी किंवा नंतर जन्मलेला असणे आवश्‍यक आहे.

आश्‍चर्याची बाब म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची एमआरआय वयनिश्‍चिती चाचणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतली होती, त्या वेळी संबंधित खेळाडू १७ वर्षांखालील असल्याचे स्पष्ट झाले होते. विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यानंतर सहभागी सर्व २४ संघांतील प्रत्येकी चार खेळाडूंची ‘फिफा’ त्यांच्या वैद्यकीय तज्ज्ञामार्फत वयनिश्‍चिती चाचणी करणार आहे. 

loading image