esakal | गोव्यातील ऑनलाइन तिकीट विक्री फसली
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्यातील ऑनलाइन तिकीट विक्री फसली

गोव्यातील ऑनलाइन तिकीट विक्री फसली

sakal_logo
By
पीटीआय

पणजी - भारतात येत्या ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची ऑनलाइन तिकीट विक्री योजना गोव्यात फसल्याचे मान्य करत आता संयोजन समितीने स्टेडियमजवळ तिकीट विक्रीचे स्टॉल्स उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा संचालक झेवियर सेप्पी यांनीच ही माहिती बुधवारी दिली. 

विश्‍वकरंडक स्पर्धा येत्या ६ ते २८ ऑक्‍टोबर या कालावधीत देशातील सहा शहरांत रंगणार आहे. गोव्यातील सामने ७ ते २१ ऑक्‍टोबर या कालावधीत खेळले जातील. क गटातील इराण, गिनी, जर्मनी व कॉस्टा रिका या संघांचे सामने फातोर्डा-मडगाव येथे खेळले जातील. ब्राझील व नायजर यांच्यातील सामना १३ ऑक्‍टोबरला होईल. ड गटातील हा एकमेव सामना गोव्यात होत आहे.

गेल्या मे महिन्यात स्थानिक आयोजन समितीने ऑनलाइन तिकीट विक्रीस सुरवात केली होती, पण अवघ्या दोनशे तिकिटांची विक्री झाली होती. त्यामुळे तिकीट विक्रीसाठी नवी योजना म्हणून स्टेडियमजवळ तिकीट विक्रीचे स्टॉल्स उभे करणार असल्याचे सेप्पी यांनी स्पष्ट केले. 

स्टॉल्स कशासाठी?
‘फिफा’ची तिकीट विक्री ऑनलाइन करण्याची योजना सपशेल फसल्याचे स्पष्ट झाल्यावर संयोजन समितीने आपल्या पारंपरिक तिकीट विक्रीच्या स्टॉल्सला पसंती दिली आहे. गोव्यात होणाऱ्या फुटबॉल सामन्यांची तिकीट विक्री थेट मैदानावर होते. राज्यातील फुटबॉलप्रेमी स्टेडियमवर जाऊन तिकिटे खरेदी करण्यास प्राधान्य देतात. आयएसएल सामन्यांची तिकीट विक्री थेट स्टेडियमवर किंवा तिकीट विक्री केंद्रावर होते. त्यासाठी मोठ्या रांगाही लागतात. त्यामुळे आता संयोजकांनी या नव्या पद्धतीने तिकीट विक्रीत नशीब अजमाविण्याचे ठरवले.

loading image