भारताने केला यशस्वी संयोजनाचा गोल

संजय घारपुरे
Monday, 30 October 2017

कोलकता - विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारतास अडीच वर्षांपूर्वी लाभले. त्या वेळी भारतीय फुटबॉल अपयशाच्या गर्तेत फसले होते. आता स्पर्धा संपत असताना फुटबॉल जगत भारताच्या यशस्वी स्पर्धेची चर्चा करीत आहे. भारतीय संघ आशिया कपची पूर्वतयारी करीत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळलेला संघ कौतुक सोहळ्यात मग्न न राहता नव्या स्पर्धेची तयारी करीत आहे. भारतीय फुटबॉल बदलले आहे. त्याची दखल घेतल्याचे स्पर्धेने नक्कीच दाखवले आहे. 

भारतास २०१५ च्या मध्यास या स्पर्धेचे यजमानपद अधिकृतपणे लाभले; पण त्याच सुमारास भारत जागतिक नकाशावर शोधावे लागेल अशा गुआमविरुद्ध पराजित झाला होता. आयएसएलमुळे भारताच्या फुटबॉल प्रगतीस हातभार लागेल, याची कोणतीही खात्री वाटत नव्हती. भारतीय फुटबॉल प्रतिष्ठेसाठी झगडत होता. आता दोन वर्षांत परिस्थिती बदलली आहे.

भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघ आशियाई कप स्पर्धेस पात्र ठरला आहे. बंगळुरु एएफसी कप स्पर्धेत कायम आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारे संयोजनातील गोंधळाचा, भ्रष्टाचाराचा आरोप न होता स्पर्धा सुरळीतपणे पार पडली आहे आणि तीही स्टेडियमचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण झाल्यावरही. चाहत्यांनी या स्पर्धेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. स्टेडियममधील प्रतिसादाची दखल प्रत्येक संघास घेणे भाग पडत होते. प्रेक्षक सहभागाचा विक्रम केवळ चाहते पकडून आणल्यामुळे झाला, असे म्हणणे या ठिकाणी गैरलागूच होईल.  भारतीय संघास त्यांच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेत एकच गोल करता आला; पण तीन सामन्यांस एकत्रित एक लाख ४७ हजार १४९ चाहत्यांचा प्रतिसाद लाभला. धीरज, अन्वर अली, जिकसन सिंग ही नावे काही दिवसांत सर्वांच्या जीभेवर रुळली. 

कोलकातावासीयांनी जागतिक महासंघाचा भारतात स्पर्धा देण्याचा निर्णय योग्य ठरवला. गुवाहाटीतील ब्राझील-इंग्लंड लढत कोलकात्यात हलवल्यावर त्या लढतीच्या तिकिटासाठी दहा लाख चाहत्यांनी उत्सुकता दाखवल्यावर फिफा पदाधिकारीही अवाक झाले. काही दिवसांच्या अंतराने कोलकात्यात लढती होऊनही चाहत्यांची संख्या साठ हजारांच्या खाली गेली नाही. 

कोणतेही फार मोठे संयोजनाचे वाद-विवाद, आरोप न होता झालेली ही भारतातील गेल्या काही वर्षांतील कदाचित पहिलीच जागतिक स्पर्धा असेल.  या स्पर्धेच्या निमित्ताने भारतात फुटबॉलचे वातावरण निर्माण करण्याचा, त्याच्या लोकप्रियतेस जास्त चालना देण्याचा फिफाचा उद्देश होता. तो नक्कीच साध्य झाला आहे.  
- शाजी प्रभाकरन, जागतिक फुटबॉल महासंघाच्या, समितीतील माजी सदस्य

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india football