esakal | रोनाल्डोशिवाय रेयालने स्पॅनिश करंडक जिंकला
sakal

बोलून बातमी शोधा

माद्रिद - ‘सुपर करंडक’ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा रेयाल माद्रिदचा संघ.

रोनाल्डोशिवाय रेयालने स्पॅनिश करंडक जिंकला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माद्रिद - स्पॅनिश लीग आणि चॅंपियन्स लीग या दोन स्पर्धांमधले द्वंद्व सुरू होण्याअगोदर गतविजेत्या रेयाल माद्रिदने रोनाल्डो आणि बेल यांच्या अनुपस्थितीतही बार्सिलोनाचा परतीच्या लढतीत २-० असा पराभव केला. आणि ५-१ अशा सरासरी विजयासह स्पॅनिश सुपर करंडक जिंकला.

या ‘अल क्‍लासिको’ म्हणून फुटबॉलविश्‍वात प्रसिद्ध असलेल्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नेमार पीएसजी क्‍लबकडे गेला असल्यामुळे बार्सिलोनाची ताकद काही अंशी कमी झाली आहे; परंतु लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेझ संघात असतानाही त्यांना विजय मिळवता आला नाही. पहिल्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गॅराथ बेल रेआल माद्रिदकडून खेळले होते; तर काल झालेल्या परतीच्या सामन्यात ते खेळले नाहीत; तरीही बार्सिलोनाला रेयालचा विजयरथ रोखता आला नाही. 

मार्को असेनसिओ आणि करिम बेनझेमा यांनी बुधवारी झालेल्या सामन्यात गोल केले. या सामन्यासाठी बेलला विश्रांती देण्यात आली होती; तर पाच सामन्यांची बंदी असल्यामुळे रोनाल्डो स्टेडियममध्ये बसून सामना पाहत होता. 

असेनसिओने पाचव्याच मिनिटाला गोल करून रेयालचे वर्चस्व निर्माण केले. यंदाच्या मोसमातला हा त्याचा दुसरा गोल आहे. ३९ मिनिटांनंतर बेन्झेमाने सामन्यातला दुसरा गोल केला. गतमोसमात स्पॅनिश लीग, चॅंपियन्स लीग जिंकणाऱ्या रेयाल माद्रिदने गेल्याच आठवड्यात झालेल्या लढतीत मॅंचेस्टर युनायटेडचा पराभव करून युरोपियन सुपर करंडक जिंकला होता.

loading image