कोरियन संघावर नियमाचे जाळे 

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

अशी आहेत बंधने 
-परिवारातील सदस्यांना भेटू शकता, त्यांच्याबरोबर राहता येणार नाही 
-भेटण्यासाठी पूर्व परवानगी आणि कालावधी निश्‍चित करणे 
-मोबाईलचा वापर कॉलसाठीच करा 
-कुठल्याही सोशल साइटवरील अकाउंट कार्यरत नसावे 

सेंट पीटसबर्ग - सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक संघावर काही ना काही बंधने आहेत;पण यातही कोरिया संघावर सर्वाधिक बंधने लादण्यात आली असून, नियमांच्या जाळ्यातच सध्या हे खेळाडू वावरत आहेत. 

प्रत्येक संघातील खेळाडूवर त्यांच्या प्रशिक्षकांनी बंधने घातली आहेत. पण, एखादवेळ अपवाद म्हणून ते मोडण्याची मुभाही दिली आहे. अर्थात, कोरिया एकच संघ असा आहे, की ज्याला नियमातून कसलीच सूट मिळत नाही. केवळ प्रशिक्षकच नाही, तर कोरिया फुटबॉल संघटनेनेच त्यांना असे करण्यास सांगितले आहे. कोरिया फुटबॉल संघाचे उपाध्यक्ष चोई यंग इल म्हणाले, ""विश्‍वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना देशातील नागरिकांच्या भावना त्यांच्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे स्पर्धेसाठी गेल्यावर खेळाडूंना मोकळीक देणे आम्हाला योग्य वाटत नाही. आम्ही काही करून बाद फेरीत पोचणार हे निश्‍चित असते, तर नियमात शिथिलता आणली असती. इथे त्याचीच खात्री नसल्यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्यावर बंधने घातली आहेत.'' 

कोरियन खेळाडूंना सराव किंवा सामना नसेल त्या दिवशी त्यांच्या परिवाराबरोबर फिरण्याची परवानगी दिली, तर त्यांच्यावर होणारा खर्चदेखील वाढेल अशी कोरिया फुटबॉल संघाला चिंता आहे. कोरियन खेळाडू परिवारातील सदस्यांना किमान भेटायला मिळणार यावरदेखील समाधानी आहेत. कोरियाचा बचावपटू किम यंग ग्वोन म्हणाला, ""परिवारातील सदस्यांबरोबर राहता येत नसल्याची खंत जरूर आहे. पण, त्यांना भेटायला मिळणार हे नसे थोडके. त्यांना नुसते भेटले तरी मनावरील दडपण कमी होते.'' 

अशी आहेत बंधने 
-परिवारातील सदस्यांना भेटू शकता, त्यांच्याबरोबर राहता येणार नाही 
-भेटण्यासाठी पूर्व परवानगी आणि कालावधी निश्‍चित करणे 
-मोबाईलचा वापर कॉलसाठीच करा 
-कुठल्याही सोशल साइटवरील अकाउंट कार्यरत नसावे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strictly rules on Korean team