esakal | स्वीडन खेळाडू उंच, आम्ही तर बुटके कोरिया मार्गदर्शकांचे पराभवानंतर रडगाणे
sakal

बोलून बातमी शोधा

 Swedens players are tall says Korea coach

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पराजित कोरियाने नाचता येईना... असाच सूर लावला. स्वीडनचे खेळाडू खूपच उंच, तर आम्ही बुटके, असेच कारण कोरियाचे मार्गदर्शक शिन तेई-यंग अपयशासाठी देत होते. 

स्वीडन खेळाडू उंच, आम्ही तर बुटके कोरिया मार्गदर्शकांचे पराभवानंतर रडगाणे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पराजित कोरियाने नाचता येईना... असाच सूर लावला. स्वीडनचे खेळाडू खूपच उंच, तर आम्ही बुटके, असेच कारण कोरियाचे मार्गदर्शक शिन तेई-यंग अपयशासाठी देत होते. 

स्वीडनने पेनल्टी किकवर केलेल्या गोलच्या जोरावर कोरियास हरवले होते; पण आपले खेळाडू स्वीडनशी शारीरिकदृष्ट्या कमी पडले, असेच शिन यांचे मत होते. "स्वीडिश खेळाडू खूपच उंच आहेत. आम्ही या खेळाडूंविरुद्ध खेळण्याची तयारी केली होती. त्या वेळी धसमुसळ्या खेळाऐवजी जास्त उंचीच्या खेळाडूवर कशी मात करता येईल, हाच विचार केला होता. पूर्वार्धानंतर या खेळाडूंना रोखू शकतो, असा विश्‍वास आम्हाला आला होता. त्यानुसार खेळही केला होता; पण पेनल्टीने सर्वच गणिते बिघडली, असे शिन यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर लगेचच पात्र 32 संघांत स्वीडिश खेळाडू सर्वाधिक उंच आहेत, असेही सांगितले. 

दक्षिण कोरियाने या लढतीसाठी संघातील सर्वांत उंच गोलरक्षक असलेल्या जो ह्येऑन वू याची निवड केली. तो 6 फूट 3 इंच उंच आहे. तो तिसऱ्या क्रमांकाचा संघातील गोलरक्षक आहे. त्यामुळे कोरियाला गोलक्षेत्रात सातत्याने एक बचावपटू ठेवणे भाग पडले. स्वीडनच्या खेळाडूंची सरासरी उंची 1.90 मीटर होती; तर कोरियाच्या खेळाडूंची 1.83 मीटर. कोरियाने जास्तीत जास्त उंच खेळाडूंना पसंती दिली. त्यामुळे किन शिन-वूक हा प्रमुख आक्रमक निवडला. त्याची उंची आहे 1.97 मीटर. कोरियाने गोलरक्षकास लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे आकडेवारी सांगते. त्याने एकंदर सहा शॉटस्‌ रोखले. स्वीडन मार्गदर्शकांनी कोरियाचा गोलीच जास्त डोकेदुखी ठरल्याचे सांगितले.