सर्बियाविरुद्ध स्विस सरस 

वृत्तसंस्था
Sunday, 24 June 2018

स्वित्झर्लंडने विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सर्बियाविरुद्ध पाचव्याच मिनिटाला पिछाडीवर पडल्यानंतर हार मानली नाही. अखेरच्या मिनिटापर्यंत झुंज देत स्वित्झर्लंडने विजय खेचून आणला आणि बाद फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. झेर्दान शकिरीने 90व्या मिनिटाला मध्य रेषेपासून मुसंडी मारत सनसनाटी गोल केला. 

कालिनीग्राड - स्वित्झर्लंडने विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सर्बियाविरुद्ध पाचव्याच मिनिटाला पिछाडीवर पडल्यानंतर हार मानली नाही. अखेरच्या मिनिटापर्यंत झुंज देत स्वित्झर्लंडने विजय खेचून आणला आणि बाद फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. झेर्दान शकिरीने 90व्या मिनिटाला मध्य रेषेपासून मुसंडी मारत सनसनाटी गोल केला. 

अलेक्‍झांडर मित्रोविच याने अचूक हेडिंगच्या जोरावर पाचव्याच मिनिटाला सर्बियाला आघाडीवर नेले होते. मध्यंतरास सर्बियाने आघाडी अबाधित राखली होती; पण उत्तरार्धात स्वित्झर्लंडने पारडे फिरविले. ग्रॅनिट झाकाने 52व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर स्वित्झर्लंडने प्रयत्न सुरू ठेवले. अखेरच्या मिनिटाला त्यांना यश आले. स्टोक सिटीच्या शकिरीने मध्य रेषेजवळ चेंडू मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवून घोडदौड केली. सर्बियाचा गोलरक्षक व्लादिमीर स्टोज्कोविच याच्या पायाजवळून त्याने चेंडू नेटमध्ये मारला. 

बदल उपयुक्त ठरला 
पूर्वार्धात सर्बियाने स्विस क्षेत्रात चढाया केल्या. त्यामुळे स्विस संघ जेरीस आला होता. त्यातच प्रमुख स्विस स्ट्रायकर हॅरिस सेफेरोविच चेंडूला केवळ पाच वेळा स्पर्श करू शकला होता. त्यामुळे मध्यंतरास त्याच्याऐवजी मारिओ गॅव्रानोविच याला बदली खेळाडू म्हणून पाचारण करण्यात आले. हा बदल उपयुक्त ठरला. त्यानंतर स्विस आक्रमणात जान आली. मारिओच्याच पासवर शकिरीने केलेला गोल निर्णायक ठरला. 

विजयी गोलची शर्यत 
उत्तरार्धात सात मिनिटांत बरोबरी झाली. त्यामुळे विजयी गोलसाठीची शर्यत चुरशीची झाली. अंतिम टप्प्यात सर्बियाने जोरदार प्रयत्न केले. त्यात त्यामुळे त्यांचे क्षेत्र खुले झाले. याचा फायदा घेत शकिरीने संधी साधली. मारिओने चेंडू सोपविल्यानंतर त्याने सर्बियाच्या डुस्को टॉसिच याला चकविले. त्यानंतर गोल नोंदवीत जोरदार जल्लोष केला. भावनेच्या भरात जर्सी काढल्यामुळे त्याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swiss wins against Serbia