युव्हेंट्‌सकडून बार्सिलोना चकित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 April 2017

चॅंपियन्स लीग - पाऊलो डीबालाचे दोन गोल
ट्युरीन (इटली) - 'युएफा' चॅंपियन्स लीगमध्ये मातब्बर बार्सिलोनाला पराभवाचा धक्का बसला. युव्हेंट्‌सने बार्सिलोनाला उपांत्यपूर्व फेरीतील घरच्या मैदानावरील सामन्यात तीन गोलांनी गारद केले. लिओनेल मेस्सीचा वारसदार अशी गणना होत असलेल्या पाऊलो डीबाला याने दोन गोल नोंदविले.

चॅंपियन्स लीग - पाऊलो डीबालाचे दोन गोल
ट्युरीन (इटली) - 'युएफा' चॅंपियन्स लीगमध्ये मातब्बर बार्सिलोनाला पराभवाचा धक्का बसला. युव्हेंट्‌सने बार्सिलोनाला उपांत्यपूर्व फेरीतील घरच्या मैदानावरील सामन्यात तीन गोलांनी गारद केले. लिओनेल मेस्सीचा वारसदार अशी गणना होत असलेल्या पाऊलो डीबाला याने दोन गोल नोंदविले.

लुईन एन्रीके प्रशिक्षक असलेल्या बार्सिलोनाने पॅरिस सेंट-जर्मेन संघाविरुद्ध 0-4 अशी पिछाडी भरून काढली होती. आता त्यांना अशाच पराक्रमाची पुनरावृत्ती करावी लागेल; पण त्यांच्यासमोर युव्हेंट्‌सचे तुलनेने जास्त कडवे आव्हान असेल. मॅसिमिलीनो अलेग्री हे युव्हेंट्‌सचे प्रशिक्षक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युव्हेंट्‌सने कडेकोट बचाव केला. लिओनार्डो बॉनुची आणि जॉर्जिओ किएलीनी यांच्याकडे बचाव फळीची सूत्रे होती.

युव्हेंट्‌सने सुरवात सकारात्मक केली. दुसऱ्याच मिनिटाला त्यांना संधी मिळाली होती. फ्री-कीकवर मिरालेम पॅनीच याने मारलेल्या चेंडूवर गोंझालो हिग्युएन याने हेडिंग केले; पण चेंडू थेट बार्सिलोनाचा गोलरक्षक मार्क-आंद्रे, तर स्टेगन याच्याकडे गेला. अर्जेंटिनाच्या हिग्यूएनचा तुलनेने फारसा प्रसिद्ध नसलेला देशबांधव मात्र चमकला. बार्सिलोनाच्या बचाव फळीत डाव्या बाजूला जेमेरी मॅथ्यू याला अनपेक्षित संधी मिळाली होती. त्याच्या ढिलाईमुळे जुआन क्‍यूऍड्रॅडो याला चेंडूवर ताबा मिळाला. पेनल्टी क्षेत्रात जुआनने डीबाला याला पास दिला. डीबाला याने शांतचित्ताने चेंडूला जाळ्याची दिशा दिली.

बार्सिलोनाचा संघ मात्र झगडत होता. त्यांची मदार मेस्सीवर होती. त्याने 21व्या मिनिटाला आगेकूच केली. युव्हेंट्‌सचा बचाव भेदून त्याने आंद्रेस इनिएस्टाला पास दिला. इनिएस्टाने चेंडू मारला; पण अनुभवी गोलरक्षक जियानलुईजी बुफॉन याने डावीकडे झेप टाकत चेंडू चपळाईने अडविला. बार्सिलोनाने 23 वर्षांच्या डीबाला याला वाजवीपेक्षा जास्त मोकळीक दिली. याचा डीबालाने पुरेपूर फायदा उठविला. मारीओ मॅंडझुकीच याच्या पासवर त्याने दुसरा गोल केला. त्या वेळी बार्सिलोनाच्या जेरार्ड पिके काही वेळ मध्ये आल्यामुळे मार्क-आंद्रे याला चेंडूचा नीट अंदाज घेता आला नाही.

बार्साचे तीन एक्के निष्प्रभ
बार्सा अर्थात बार्सिलोनाची मदार मेस्सीवर होती; पण त्याचा एक गोल "ऑफसाइड' ठरविण्यात आला. बार्सिलोनाचा आणखी एक हुकमी खेळाडू लुईस सुआरेझ यालाही फॉर्म गवसला नाही. त्याने हेडिंग केले; पण चेंडू स्वैर गेला. बार्सिलोनाच्या हुकमी एक्‍यांच्या त्रयीतील नेमार याची तर यूव्हेंट्‌सचा "सेंटर-बॅक' बॉनुची याने जोरदार नाकेबंदी केली.

उत्तरार्धात बार्साच्या खेळातील समन्वय आणखी कमी झाला. याचा फायदा घेत किएलीनी याने जोरदार हालचाली केल्या. डाव्या बाजूने कॉर्नरवर पॅनीच याने मारलेला चेंडू त्याने जेव्हीयर मॅशेरॅनो याला हतप्रभ ठरवित अचूक हेडिंग केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uefa champions league football competition