उरुग्वेच्या चालीत रोनाल्डो निष्प्रभ एडिसन कॅवानी-लुईस सुआरेझचा बहारदार समन्वय निर्णायक

वृत्तसंस्था
Monday, 2 July 2018

लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले. त्यांच्या आगळ्या चालीने लढतीचा निर्णय सातव्या मिनिटासच केला होता.

सोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले. त्यांच्या आगळ्या चालीने लढतीचा निर्णय सातव्या मिनिटासच केला होता.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आर्मीचे आक्रमण आणि उरुग्वेचा भक्कम बचाव यांच्यात ही लढत आहे. त्यात रोनाल्डो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उरुग्वे किती मिनिटे गोलपासून रोखणार आणि त्यानंतर कधी प्रतिआक्रमणात संधी साधणार याचेच विश्‍लेषण सामन्यापूर्वी सुरू होते. प्रत्यक्षात सातव्या मिनिटास कॅवानी आणि सुआरेझच्या दोन क्रॉसनी पोर्तुगालला खच्ची केले. या गोलमुळे युरो विजेत्यांवर उरुग्वेला कायम गाठण्याची वेळ आली. उत्तरार्ध सुरू होण्यापूर्वी रोनाल्डोने सहकाऱ्यांना काय करायचे हा खास वेगळा सल्ला दिल्यानंतरही निकाल बदलला नाही.

सातव्या मिनिटास आपल्या गोलक्षेत्रात चेंडूचा ताबा घेतल्यावर कॅवानी वेगाने निघाला. आक्रमणासाठी गेलेल्या पोर्तुगाल मध्यरक्षकांनी त्याला गाठले, पण त्यांना कसलीही कल्पना नसताना कॅवानीने चेंडू मैदानाच्या पार दुसऱ्या टोकाला सुआरेझकडे क्रॉस केला, त्या वेळी तो अनमार्क होता. सुआरेझने वेगाने गोलक्षेत्रात प्रवेश केला; त्या वेळी तो आणि त्याच्या पासच्या आवाक्‍यात असलेल्या उरुग्वे खेळाडूंना पोर्तुगालने मार्क केले, पण हे सर्व घडत असताना तीस मीटर वेगाने धावत कॅवानी गोलक्षेत्रात आला आहे, याकडे पोर्तुगालचे दुर्लक्ष झाले. सुआरेझने नेमके हेच जाणले होते. त्याच्या अचूक पासवर कॅवानीच्या हेडरने पोर्तुगालला पार खच्ची केले.

उरुग्वे बचाव फळीकडून झालेल्या एकमेव चुकीचा फायदा घेत पेपेने पोर्तुगालला उत्तरार्धात बरोबरी साधून दिली खरी, पण सात मिनिटातच सुआरेझ-कॅवानी चालीने पोर्तुगालवर पुन्हा दडपण आणले. आक्रमक वाढवण्याची, गोलरक्षकास आक्रमणात उतरवण्याची पोर्तुगालची चालही अपयशी ठरली अन्‌ सामना संपल्यावर रोनाल्डोबाबत त्याची खिलाडूवृत्तीच लक्षात राहिली, हेच पोर्तुगालचे अपयश ठरले.

प्रथम चेंडू डावीकडे क्रॉस झाला नंतर उजवीकडे, हे रोखण्यास कोणतीही योजना नसते. त्याचे आक्रमक खूपच प्रभावी होते. एक कायमचा आक्रमणात होता, तर दुसरा बचावातून येत होता. हे जबरदस्तच होते. त्यांनी कधीही या प्रकारचा गोल यापूर्वी केलेला नाही.
- फर्नांडो सॅंतोस, पोर्तुगाल मार्गदर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uruguay vs Argentina football worldcup 2018