esakal | सफाईदार विजयासह ब्राझीलची आगेकूच
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2018 Brazil Beat Serbia

विश्‍वकरंडक स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना खेळताना सर्बियाचे खेळाडू उपस्थित चाहत्यांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरले असले, तरी ब्राझीलने आपल्या लौकिकाची झलक दाखवून देत सफाईदार विजयासह आगेकूच कायम राखली. 

सफाईदार विजयासह ब्राझीलची आगेकूच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को - विश्‍वकरंडक स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना खेळताना सर्बियाचे खेळाडू उपस्थित चाहत्यांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरले असले, तरी ब्राझीलने आपल्या लौकिकाची झलक दाखवून देत सफाईदार विजयासह आगेकूच कायम राखली. 

ब्राझीलने अखेरचा सामना 3-0 असा जिंकत गटात अव्वल स्थान पटकावले. त्यांची गाठ आता मेक्‍सिकोशी पडणार आहे. संपूर्ण सामन्यात ब्राझीलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला यात शंकाच नाही. पण, अखेरच्या सामन्याचे मध्यवर्ती आकर्षण राहिलेला नेमार गोल करू शकला नाही, याचे शल्य त्यांना नक्कीच वाटत असेल. 

संपूर्ण सामन्यात नेमारने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, त्याला आपल्या योजनेला अंतिम स्वरुप देता आले नाही. कधी त्याला रोखण्यात सर्बियाची बचावफळी यशस्वी झाली, तर कधी त्याच्याकडून चूक झाली. त्याने एकट्याने या सामन्यात 119 पास दिले. यावरूनच त्याची गुणवत्ता दिसून आली, पण त्याच्या किकमध्ये जोर नव्हता हे विसरता येणार नाही. पायाच्या दुखापतीने होत असलेल्या वेदना त्याच्या हालचालीतून दिसून आल्या. 

सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच दुखापतीने ब्राझीलला मार्सेलोला बदलावे लागले होते. त्यानंतरही त्यांचा कौशल्यपूर्ण खेळ लक्षवेधक ठरत होता. कुटिन्हो आणि पौलिन्हो यांच्यातील समन्वय पहिल्या गोलसाठी निर्णायक ठरला. मोकळी जागा दिसता कुटिन्होने सर्बियाच्या वेजकोविच आणि मिलेनकोविच यांना चकवून हवेतून चेंडू पुढ दिला. पौलिन्होने ही संधी साधून खास ब्राझील "टच' देत पहिला गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात सुरवातीची काही मिनिटे सर्बियाच्या आक्रमकांनी ब्राझीलच्या बचावफळीला जणू बचावाचा सराव दिला. त्या वेळी त्यांच्याकडून एखाद गोल अपेक्षित होता. पण, ब्राझीलच्या बचावफळीने त्यांना दाद दिली नाही. त्यांचा गोलरक्षक ऍलिसनही तेवढाच दक्ष होता. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात नेमारच्या कॉर्नर किकवर थिएगो सिल्वाने अप्रतिम हेडर करत दुसरा गोल केला. 

ब्राझीलचे कर्णधार रोटेशन कायम 
ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांनी कर्णधारासाठी "रोटेशन'चे नियोजन या सामन्यातही कायम राखले. त्यांनी तिसऱ्या साखळी सामन्यात तिसरा कर्णधार दिला. पहिल्या सामन्यात त्यांनी मार्सेलोला कर्णधार केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी तीच जबाबदारी थिएगो सिल्वावर सोपविली आणि तिसऱ्या सामन्यात त्यांनी मिरांडाला कर्णधार केले होते.