जर्मनीची आज पुन्हा अग्निपरीक्षा प्रशिक्षक जोकिम लोव नवोदितांना संधी देण्याची शक्‍यता 

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

टोनी क्रूसच्या भन्नाट गोलाच्या जोरावर आव्हान कसेबसे तरणाऱ्या गतविजेत्या जर्मनीला पुन्हा एकदा अग्निदिव्याचा सामना करावा लागणार आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना दक्षिण कोरियाविरुद्ध दोन गोलांच्या फरकाने विजय आवश्‍यक असेल, अशा या निर्णायक सामन्यात जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लोव पुन्हा एकदा प्रथितयश खेळाडूंपेक्षा नव्या चेहऱ्यावर भर देण्याची शक्‍यता आहे. 
 

काझन (रशिया) - टोनी क्रूसच्या भन्नाट गोलाच्या जोरावर आव्हान कसेबसे तरणाऱ्या गतविजेत्या जर्मनीला पुन्हा एकदा अग्निदिव्याचा सामना करावा लागणार आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना दक्षिण कोरियाविरुद्ध दोन गोलांच्या फरकाने विजय आवश्‍यक असेल, अशा या निर्णायक सामन्यात जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लोव पुन्हा एकदा प्रथितयश खेळाडूंपेक्षा नव्या चेहऱ्यावर भर देण्याची शक्‍यता आहे. 

1938 नंतर जर्मनी कधीच गटात बाद झालेले नाही. आतापर्यंतच्या त्यांचा खेळ बघता त्यांच्या डोक्‍यावर साखळीत बाद होण्याची टांगती तलवार अजूनही आहे. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि हीच खरी आमची संघरचना आहे, असे लोव यांनी सांगितले. स्वीडनविरुद्धच्या सामन्यात त्यांनी असेच धक्कातंत्र अवलंबिले होते. त्या सामन्यात नामवंत खेळाडू मासूत ओझिल, सॅमी खेद्रिया यांना पहिल्या सामन्यात खेळल्यानंतर वगळले होते. हे दोघेही गतविजेतेपदातील खेळाडू होते. उद्याच्या सामन्यात अशा आणखी काही खेळाडूंना वगळून त्यांच्याऐवजी नवोदितांना संधी देण्याचे संकेत लोव्ह यांनी दिले आहेत. 

गतस्पर्धेत सराव सामन्यात दुखापत झाल्यामुळे मार्कस रुस खेळू शकला नव्हता. स्वीडनविरुद्ध संधी मिळताच त्याने कौशल्य दाखवले होते. उद्याच्या सामन्यात तो सुरवातीपासून खेळण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे निकलस सुएलीला जेरमी बोटेंगऐवजी संधी मिळेल. स्वीडनविरुद्धच्या सामन्यात नाकाला दुखापत झाली आणि रक्त जर्सीला लागले; परंतु एकच जर्सी असल्यामुळे पुन्हा मैदानात न येऊ शकलेल्या रुडीवर लोव्ह यांचा विश्‍वास कायम असेल. खेद्रियाऐवजी तो उद्या खेळेल. मेक्‍सिकोविरुद्ध आपला खेळ लौकिकास साजेसा नव्हता, हे खेद्रियाने मान्य केले आहे. 

गतस्पर्धेतील जर्मनीच्या विजेत्या संघातील भरवशाचा खेळाडू थॉमस मुल्लरला रशियात अजून प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे त्याच्यावरही दडपण असेल. उद्याच्या सामन्यात त्याची जागा 22 वर्षीय ब्रॅंडट्‌ घेऊ शकेल. आत्तापर्यंत त्याला दोनदा राखीव खेळाडू म्हणून मैदानात येण्याची संधी मिळाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2018 Germany vs South Korea