नेऊर परतला; पण जर्मनीची हार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

क्‍लागेनफर्ट - जर्मनीचा जगद्विख्यात गोलरक्षक मॅन्युअल नेऊर आठ महिन्यांनंतर परतला; परंतु विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. ऑस्ट्रियाने गतविजेत्या जर्मनीचा २-१ असा पराभव करून खळबळ उडवून दिली. 

क्‍लागेनफर्ट - जर्मनीचा जगद्विख्यात गोलरक्षक मॅन्युअल नेऊर आठ महिन्यांनंतर परतला; परंतु विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. ऑस्ट्रियाने गतविजेत्या जर्मनीचा २-१ असा पराभव करून खळबळ उडवून दिली. 

पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी प्रत्येक संघाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्तीचाही आढावा घेतला जात आहे. गतविजेत्या जर्मनीचाही अंतिम २३ खेळाडूंचा संघ जाहीर होणार आहे. त्यासाठी नेऊरची तंदुरुस्ती ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यातून तपासली जाणार होती. या सामन्यात मेसूत ओझीलने जर्मनीला सुरवातीलाच आघाडी मिळवून दिल्यानंतर नेऊर ऑस्ट्रियाच्या मार्टिन हिंटरगेर आणि अलेसांड्रो स्कॉरेफने मारलेले चेंडू रोखू शकला नाही.

सट्टेबाज आणि जाणकारांनी पुन्हा जर्मनीला विजेतेपद मिळवण्याची पसंती दिलेली आहे; पण काही दिवसांत विजेतेपद राखण्याची मोहीम सुरू करण्यापूर्वी झालेला हा पराभव जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लोव्ह यांची चिंता वाढवणारा आहे. गेल्या पाच सामन्यांत जर्मनीला विजय मिळवता आलेला नाही. मार्च महिन्यात ब्राझीलकडून ०-१ अशी हार झाल्यानंतर त्यांच्या कामगिरीची घसरण झाली आहे. 

प्रदीर्घ काळानंतर परतणाऱ्या नेऊरने चांगले पुनरागमन केले, असे मत लोव्ह यांनी व्यक्त केले. पराभव चिंता करणारा  आहे. या सामन्यात पहिल्या अर्ध्यात आम्ही चांगला खेळ केला; मात्र दुसऱ्या अर्ध्यात चेंडूवरचा ताबा कमी होत गेला आणि परिस्थितीत अडचणी करून घेतली. आमच्या सर्वच खेळाडूंकडून चुका झाल्या, अशीही खंत लोव्ह यांनी व्यक्त केली. 

ऑस्ट्रियाने ३२ वर्षांनंतर प्रथमच आपल्या शेजारी जर्मनीविरुद्ध हा पहिला विजय मिळवला आहे. व्हिएना येथे ऑक्‍टोबर १९८६ मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रियाने जर्मनीला ४-१ असे चकित केले होते. 

ब्राझीलच्या विजयात नेमारचा गोल
या वर्षी सर्वात महागडा ठरलेल्या नेमारच्या दुखापतीची चिंता मिटली. ब्राझीलने रविवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात क्रोएशियाचा २-० असा पराभव केला. सफाईदार खेळ करणाऱ्या ब्राझीलकडून नेमारने ६९ व्या, तर फिर्मिनो याने भरपाई वेळेत ९३ व्या मिनिटाला गोल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world cup football practice match australia german