महिला हॉकी संघासमोर चीनही नमले

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

चीनविरुद्ध बचाव चांगला होणे आवश्‍यक असते. ते कधीही प्रतिकार करू शकतात. सुरवातीस आघाडी घेऊन चीनवर दडपण आणण्याची योजना यशस्वी झाली. योजनेनुसार खेळ केल्यामुळेच यश मिळवू शकलो. हे यश कोणा एकाचे नाही, तर संघाचे आहे.
- वंदना कटियार

मुंबई - भारताने आशियाई महिला हॉकी क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनचा पराभव केला. गतविजेत्या भारताचा आशियाई महिला चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय. जपानविरुद्धच्या लढतीत भारताच्या गोलात मोलाची कामगिरी बजावलेल्या वंदना कटारियाने दोन गोल करीत भारतास ३-१ असे विजयी केले. 

कोरियातील दाँगही सिटी स्टेडियमवरील या स्पर्धेत भारताने सलामीला जपानला ४-१ असे हरविले होते. तोच जोश कायम ठेवताना वंदनाने चौथ्या आणि अकराव्या मिनिटास गोल करीत भारतास हुकमत मिळवून दिली. पहिल्या सामन्यात हॅटट्रिक केलेल्या गुरजीत कौरने ५१ व्या मिनिटास भारताचा तिसरा गोल केला होता. 

आक्रमण आणि बचावात योग्य सामंजस्य असल्यामुळेच भारतास हुकमत राखता आली. चीनला स्थिरावण्याची संधीही न देता भारताने आक्रमण केले. लिलिमा मिंझ, नवज्योत कौर आणि वंदना कटारियाने चीनच्या बचावफळीवर दडपण आणले. गोलक्षेत्रात नवज्योतने लिलिमाकडे पास केला. आपल्यासमोरील बचावपटूंची कोंडी बघितल्यावर लिलिमाने हुशारीने रिव्हर्स शॉट केला. त्या वेळी चेंडू वंदनाच्या स्टीकला लागून गोलजाळ्यात गेला. सातच मिनिटांत बचावपटूंच्या कोंडीत अडकलेल्या उदिताने हुशारीने चेंडू वंदनाकडे पास केला. वंदनाच्या ताकदवान शॉटने भारताची आघाडी वाढवली. 

जागतिक क्रमवारीत आठवे असलेल्या चीनने चार पेनल्टी कॉर्नर दवडल्यावर पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. पंधराव्या मिनिटास गोलफलक २-१ असे दर्शवत होता. चीनने आक्रमणाचा धडाका दुसऱ्या सत्रात कायम राखला; पण भारताचा बचाव भक्कम होता. तिसऱ्या सत्रात आक्रमण, प्रतिआक्रमणाची चांगली लढाई झाली.

एका गोलची भारताची आघाडी धोक्‍यात आहे, असेच वाटत होते. गुरजितने ५१ व्या मिनिटास मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत भारताचा सलग दुसरा विजय निश्‍चित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asian champions hockey india won

टॅग्स