चॅंपियन्स हॉकी जेतेपद भारताकडून पुन्हा निसटले

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जुलै 2018

भारताचा कडवा प्रतिकार मोडीत काढत ऑस्ट्रेलियाने चॅंपियन्स करंडक हॉकीतील आपली हुकमत कायम राखली. निर्धारित तसेच पेनल्टी शूटआउटवरील सदोष नेमबाजीचा भारतास फटका बसला. कांगारूंनी पेनल्टी शूटआउट 3-1 असे जिंकत विक्रमी पंधराव्यांदा ही स्पर्धा जिंकली.

ब्रेडा - भारताचा कडवा प्रतिकार मोडीत काढत ऑस्ट्रेलियाने चॅंपियन्स करंडक हॉकीतील आपली हुकमत कायम राखली. निर्धारित तसेच पेनल्टी शूटआउटवरील सदोष नेमबाजीचा भारतास फटका बसला. कांगारूंनी पेनल्टी शूटआउट 3-1 असे जिंकत विक्रमी पंधराव्यांदा ही स्पर्धा जिंकली. 

गतस्पर्धेत भारतास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्या वेळीही ऑस्ट्रेलियाने पेनल्टी शूटआउटवरच बाजी मारली होती. निर्धारित वेळेतील 1-1 बरोबरीनंतर भारताचे सरदारसिंग, हरमनप्रीतसिंग आणि ललित सुरवातीच्या तीन प्रयत्नांत गोल करण्यात अपयशी ठरले, तिथेच भारताची हार निश्‍चित झाली होती. टॉम क्रेगला गोलपासून श्रीजेशने रोखल्यावर मनप्रीतने गोल करीत भारताच्या आशा जागवल्या; पण ऑस्ट्रेलियाने गोल करीत भारताच्या आशा संपुष्टात आणल्या. 

ताकदवान ऑस्ट्रेलियाने अपेक्षेनुसार आघाडी घेतली होती; पण त्यानंतर भारतीयांनी चांगला बचाव केला. 24 व्या मिनिटास ब्लेक ग्रोव्हरने श्रीजेशला चकवल्यावर भारतीय कर्णधार सतर्क झाला. त्यामुळे भारतीय आक्रमकांनी प्रतिआक्रमण सुरू केले. अठरावर्षीय विवेक प्रसादने 42 व्या मिनिटास मैदानी गोलवर भारतास बरोबरी साधून दिली.

निर्धारित वेळेत भारताने ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड खेळ केला. चाहत्यांचाही चांगला पाठिंबा होता; पण दवडलेले पाच पेनल्टी कॉर्नर तसेच मैदानी गोलच्या किमान चार संधींमुळे भारताचा विजय हुकला. प्रामुख्याने कमकुवत असणारा बचाव प्रभावी ठरल्यावरही भारताचा विजय हुकलाच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia beat india in hockey champions trophy 2018