ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका बरोबरीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

व्हिक्‍टोरिया (ऑस्ट्रेलिया) - भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची हॉकी मालिका जिंकण्यात अपयश आले. उत्तरार्धात जेझ हेवॉर्डने केलेल्या दोन गोलने ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना बुधवारी २-३ अशा पिछाडीवरून ४-३ असा जिंकला. त्यामुळे दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. 

व्हिक्‍टोरिया (ऑस्ट्रेलिया) - भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची हॉकी मालिका जिंकण्यात अपयश आले. उत्तरार्धात जेझ हेवॉर्डने केलेल्या दोन गोलने ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना बुधवारी २-३ अशा पिछाडीवरून ४-३ असा जिंकला. त्यामुळे दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. 

निमंत्रित हॉकी स्पर्धेतील ब्राँझपदक आणि कसोटी मालिकेतील बरोबरी यामुळे भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलिया दौरा फलदायीच ठरला. दुसऱ्या सामन्यातही भारतीयांचा खेळ उल्लेखनीय झाला. कर्णधार रघुनाथने भारताच्या विजयासाठी झोकून दिले; पण अखेरीस त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. पूर्वार्धातील पहिले सत्र वेगवान ठरले. सहाव्याच मिनिटाला आकाशदीपने जाळीचा वेध घेत भारताला आघाडीवर नेले; पण १३व्या मिनिटाला ट्रेंट मिटॉन याने मैदानी गोल करून ऑस्ट्रेलियाला बरोबरीवर आणले.

पूर्वार्धातील दुसरे सत्र वेगवान म्हणण्यापेक्षा अधिक दडपणाखाली खेळले गेले. दोन्ही संघ आक्रमण आणि प्रतिआक्रमणात व्यग्र राहिले. त्यामुळे दोन मिनिटांत दोन गोल बघायला मिळाले. प्रथम २२व्या मिनिटाला रघुनाथने कॉर्नर सत्कारणी लावत भारताला आघाडीवर नेले. पुढच्याच मिनिटाला जेक व्हेटीने ऑस्ट्रेलियाला पुन्हा बरोबरीवर आणले. या गोलनंतर पुन्हा एकदा भारताचे प्रतिआक्रमण सरस ठरले. सामन्याच्या २५व्या मिनिटाला रघुनाथने आणखी एक कॉर्नर सत्कारणी लावताना भारताला ३-२ असे आघाडीवर नेले. 

विश्रांतीच्या आघाडीनंतर उत्तरार्धात भारतीय खेळाडू सातत्य राखू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय खेळाडू अधिक थकलेले वाटले. याचा फायदा यजमानांनी उठवला. तिसऱ्या सत्रात सामन्याच्या ३८व्या मिनिटाला हेवर्डने ऑस्ट्रेलियाला पुन्हा बरोबरीवर आणले आणि ५१व्या मिनिटाला आणखी एक गोल करून ऑस्ट्रेलियाला सामन्यात प्रथमच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर यजमानांनी बचाव भक्कम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia Tie series