पेनल्टी कॉर्नरवरील गोल निर्णायक ठरणार - राणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पश्‍चिम व्हॅंकूव्हर - वर्ल्ड हॉकी महिला लीगच्या दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेतील उपांत्य लढतीत पेनल्टी कॉर्नरवरील गोल महत्त्वाचे ठरतील, असे मत भारताची कर्णधार राणीने व्यक्त केले. भारताची उपांत्य फेरीची लढत रविवारी (ता. 9) बेलारुसविरुद्ध होणार आहे.

पश्‍चिम व्हॅंकूव्हर - वर्ल्ड हॉकी महिला लीगच्या दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेतील उपांत्य लढतीत पेनल्टी कॉर्नरवरील गोल महत्त्वाचे ठरतील, असे मत भारताची कर्णधार राणीने व्यक्त केले. भारताची उपांत्य फेरीची लढत रविवारी (ता. 9) बेलारुसविरुद्ध होणार आहे.

कॅनडात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने गटसाखळीत बेलारुसचे कडवे आव्हान 1-0 असे परतवले होते, पण बेलारुसने उपांत्यपूर्व फेरीत यजमान कॅनडास 4-3 असा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतास या लढतीत विजय गृहीत धरता येणार नाही. साखळीतील दोन्ही लढतींत दवडलेले पेनल्टी कॉर्नर भारतास सलत आहेत.

बेलारुसविरुद्ध भारतास पाचपैकी एकाही पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नव्हता. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. आगामी लढतीत पेनल्टी कॉर्नरवरील गोल महत्त्वाचे ठरतील. त्यासाठी आम्ही सरावात जास्त लक्ष दिले आहे, असे राणीने सांगितले. त्याचबरोबर मॅन टू मॅन मार्किंगमध्येही भारतास सरस राहावे लागेल, असे तिचे मत आहे. ती म्हणाली, बेलारुसविरुद्ध चांगल्या कामगिरीचा विश्‍वास आहे. त्यांना कमी लेखणार नाही. त्यांना पराजित करण्यासाठी मॅन टू मॅन मार्किंगमधील हुकूमत मोलाची ठरेल.

उपांत्य फेरीतील विजय हेच भारताचे या स्पर्धेतील अंतिम लक्ष्य नाही. या स्पर्धेतील विजेतेपद जिंकूनच उपांत्य स्पर्धेच्या टप्प्यास पात्र ठरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे नक्कीच आम्ही साध्य करू शकतो.

साखळीत उरुग्वेविरुद्धच्या विजयासाठी पेनल्टी शूटआऊटपर्यंत प्रतीक्षा करावी लागली, हे आम्हाला सलत आहे. खरं तर ही लढत निर्धारित वेळेतच जिंकायला हवी होती. त्या सामन्यात अनेक चुका झाल्या होत्या. बेलारुसविरुद्ध या चुका टाळल्या, पण आता अधिक खेळ उंचावण्याची गरज आहे.
- राणी, भारतीय कर्णधार.

भारताच्या गटातील सर्व संघ उपांत्य फेरीत
सात संघांच्या या स्पर्धेत भारताचा समावेश असलेल्या "अ' गटात तीनच संघ होते. दोन्ही लढती जिंकलेला भारत गटविजेता झाला. उरुग्वेने बेलारुसला हरवून गटात दुसरा क्रमांक मिळविला होता. उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेने मेक्‍सिकोला, तर बेलारुसने कॅनडास हरवून उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे आता "ब' गटातील केवळ चिली हाच संघ उपांत्य फेरीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decisive goal from a penalty corner