भारतास आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकीचे विजेतेपद राखण्यात अपयश 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

राष्ट्रकुलातील अपयशामुळे महिला हॉकी संघाकडे परत धाडलेले शूअर्ड मरीन त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले. भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाविरुद्ध 0-1 हार पत्करावी लागली. 
 

मुंबई - राष्ट्रकुलातील अपयशामुळे महिला हॉकी संघाकडे परत धाडलेले शूअर्ड मरीन त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले. भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाविरुद्ध 0-1 हार पत्करावी लागली. 

दुसऱ्या सत्रात ली यंग हिने केलेल्या गोलने लढतीचा निर्णय केला, पण कधीही कोरियाने सामन्यावरील पकड गमावली नव्हती. भारताने साखळीत एकही लढत गमावली नव्हती, पण आपण भारताच्या आक्रमणाचा ओघ रोखू शकतो, याचे संकेत कोरियाने साखळी लढतीत दिले, पण त्यावर मात करण्यात मरीन अपयशी ठरले. गतवर्षी हरेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघाने आशिया स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता विश्‍वकरंडक स्पर्धा काही आठवड्यांवर असताना जेतेपद राखण्यात मरीन अपयशी ठरले आहेत. 

कोरियाने प्लेअर टू प्लेअर मार्किंग पद्धतीने खेळ केला. वंदना कटारियाची कोंडी केल्यावर भारतीय आक्रमणाची साखळी तोडली जाईल, हे कोरियाने जाणले. त्यांनी वंदनाची जवळपास कोंडी करीत ही चाल यशस्वीही ठरवली. वंदनाच्या वेगवान चाली सुरवातीस कोरियाची डोकेदुखी ठरत होत्या, पण कोरियाची व्यूहरचना यशस्वी ठरू लागल्यावर भारतीय आक्रमकांना पंचवीस यार्ड रेषेजवळ चेंडू नेणेही अवघड झाले होते. त्यातच दोन्ही बगलांतून आक्रमण करीत कोरियाने भारतीय बचावफळीवरील दडपण वाढवले. भरवशाची गोलरक्षिका सविताही या दडपणाखाली अखेर कोलमडली. 

मरीन किंवा संघव्यवस्थापनास काय करावे, हेच उमजत नव्हते. मध्यरक्षिकांना चेंडूवर नियंत्रण राखणे जमत नव्हते. हॉकीतील यशापयश मध्यरक्षिकेच्या कामगिरीवर अवलंबून असते. खेळाडूत बदल सोडल्यास काही वेगळे घडत असल्याचे क्वचितच दिसले. मरीन यांनी पुरुष संघासोबत असताना अखेरच्या मिनिटात गोलरक्षिकेला ब्रेक दिला होता. हेच त्यांनी महिला संघाबाबत करून पाहिले. वंदनाच्या कसोशीच्या प्रयत्नांनी एक संधी काहीशी निर्माण झाली, पण याव्यतिरिक्त फारसे काही साधले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Failure to keep India champions in Asia Champions Trophy