भारतीयांची पाकिस्तानला बरोबरीची ‘भेट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

या बरोबरीमुळे आम्ही निराश आहोत. या लढतीत विजय हवाच होता. आम्ही निराशा केली. संयम राखू शकलो नाही. ही चूक करणे म्हणजे संघाशी प्रतारणा करण्यासारखे झाले. अतिआक्रमक झाल्याची चूक आम्हाला भोवली.
- रूपिंदर सिंग, भारतीय हॉकीपटू

गोल्ड कोस्ट - अखेरच्या काही मिनिटांत गोल स्वीकारण्याचे भारतीय हॉकीचे दुखणे पुन्हा उफाळून आले. पहिल्या १९ मिनिटांत दोन गोल केलेल्या भारतास पाकिस्तानच्या वादग्रस्त गोलमुळे विजयापासून वंचित राहावे लागले. दोन वर्षांत पाकिस्तानविरुद्धच्या सर्व लढती सहज जिंकलेल्या भारतीय संघाने खराब खेळ करीत पाकिस्तानला जणू हार टाळण्यास मदतच केली.

दिलप्रीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग या नवोदितांनी गोल करीत भारतास १९ मिनिटांतच आघाडीवर नेले; पण त्या गोलनी भारतीयांचा आत्मविश्‍वास जरा जास्तच उंचावला. त्यामुळे चुका होण्यास सुरुवात झाली. चेंडूवर अतिरिक्त ताबा ठेवण्याची चूक दिसू लागली. 

श्रीजेशने गोलरक्षणात सर्वोत्तम कामगिरी केली नसती, तर पराभवाची नामुष्की आली असती. जीत गया भई जीत गया, अशा भारतीय पाठीराख्यांच्या घोषणा सुरू असतानाच ७.३ सेकंद शिल्लक असताना मिळवलेल्या पेनल्टी कॉर्नरवर पाकिस्तानने बरोबरी साधली.

पाकिस्तानचे मार्गदर्शक रोएलॅंत ऑल्तमन्स काही महिन्यांपर्यंत भारतीय मार्गदर्शक होते. त्यांनी पेनल्टी कॉर्नरच्या वेळी सातत्याने आपल्या खेळाडूंना सूचना देत भारतीयांवरील दडपण वाढवले. मध्यांतरापूर्वी पाच मिनिटांत पेनल्टी कॉर्नर मिळवत पाकिस्तानने काय घडू शकते, याचा इशारा दिला होता. त्यातून तिसऱ्या आणि चौथ्या सत्रासाठी धडा घेण्याऐवजी भारतीय मध्यरक्षकांना चेंडूवर ताबा ठेवण्यात अपयश आले. त्यांनी पाकला चेंडूवरील वर्चस्वाची संधी दिली. त्याचा फटका भारतास बसला.

भारताकडे पेनल्टी कॉर्नरवर गोल करू शकणारे चांगले ड्रॅग फ्लिकर असताना आक्रमक वैयक्तिक कौशल्यावर भर देत गोल करण्याचा प्रयत्न करीत होते. पास देण्यास उशीर करीत होते. त्यामुळे अखेरच्या दोन सत्रांत भारतास एकच पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याच वेळी श्रीजेशचे कौशल्य पाकिस्तानचे गोल मर्यादित ठेवत होते; मात्र, अखेरीस त्याला चकवण्याची ऑल्तमन्स यांची चाल यशस्वी ठरली. पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर देण्याचा निर्णय वादग्रस्त होता; पण त्याच वेळी ऑल्तमन्स यांनी श्रीजेशचा गोंधळ करण्यासाठी एका आक्रमकास डाव्या बाजूने हल्ल्यासाठी तयार राहायला सांगितले आणि कोलमडत्या भारतीय बचावाकडून चूक झाली. मुबाशार अली याची सामन्यातील अखेरच्या पेनल्टी कॉर्नरवरील ड्रॅगफ्लीक सर्वोत्तमच होती; पण त्या वेळी भारतीय बचावाचा अभ्यासही होता. भारतीय नेमके त्यातच कमी पडले.

जोरदार जल्लोष
या लढतीसाठी स्टेडियम हाऊसफुल होते. दोन्ही देशांच्या पाठीराख्यांबरोबरच ऑस्ट्रेलियनही मोठ्या संख्येने होते. ढोल-ताशांच्या गजरापेक्षा जीतेगा भाई जीतेगाचा गजर जास्त होता. अखेरच्या पंधरा मिनिटांत पाकचे वर्चस्व असतानाही भारतीय पाठीराखे जास्त जोशात होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hockey competition india pakistan