जागतिक हॉकी लीगमध्ये भारत, पाक एकाच विभागात

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

लंडन टप्प्यासाठी भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑलिंपिक विजेते अर्जेंटिना, नेदरलॅंडस्‌ व कोरिया पात्र ठरले आहेत. पात्रता स्पर्धेनंतर अन्य चार संघ निश्‍चित होतील.

मुंबई : जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्याची विभागणी झाली असून, भारत आणि पाकिस्तानला एकाच विभागात ठेवण्यात आले आहे. ही 10 दिवसांची स्पर्धा 15 ते 25 जूनदरम्यान लंडनला होणार आहे.

गतवर्षीच्या जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या एकाच विभागात भारत आणि पाकिस्तानचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी अँटवर्प येथील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. या लढतीतील दोन्ही गोल रमणदीप सिंगने केले होते.

लंडन टप्प्यासाठी भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑलिंपिक विजेते अर्जेंटिना, नेदरलॅंडस्‌ व कोरिया पात्र ठरले आहेत. पात्रता स्पर्धेनंतर अन्य चार संघ निश्‍चित होतील.

उपांत्य फेरीचा दुसरा टप्पा जोहान्सबर्गला जुलैमध्ये होईल. येथील स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी, स्पेन व न्यूझीलंड पात्र ठरले आहेत. जागतिक हॉकी लीगचा अंतिम टप्पा भारतात डिसेंबरमध्ये होईल. ही स्पर्धा भारतातच 2018 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेची पहिली पात्रता स्पर्धा असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India, Pakistan in same group for World Hockey League