उपांत्यपूर्व फेरीत आज भारताची गाठ स्पेनशी

hockey
hockey

लखनऊ - कुमार विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत साखळीत भारतीय संघ भलेही अपाराजित राहिला असला, तरी अखेरच्या सामन्यात त्यांना संघर्ष करावा लागला, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच उद्या (गुरुवारी) जेव्हा उपांत्यपूर्व फेरीत स्पेनविरुद्ध भारतीय संघ मैदानात उतरेल, तेव्हा साधी आणि सरळ हॉकी खेळण्याचेच त्यांचे उद्दिष्ट असेल.
साखळीत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आव्हान दिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पहिल्या दोन विजयांत भारताचे निर्विवाद वर्चस्व होते; पण अखेरचा सामना त्यांना विनाकारण कठीण केला होता.
पंधरा वर्षांनी पुन्हा एकदा विजेतेपदाला गवसणी घालण्याचे उद्देश ठेवलेल्या भारतीय संघाला या सामन्यातून निश्‍चित काही धडे मिळाले असतील.

सध्याचा फॉर्म लक्षात घेता भारताची बाजू वरचढ असेल. स्पर्धेपूर्वी स्पेनध्ये झालेल्या चार देशांच्या स्पर्धेत भारताने स्पेनवर दोन वेळा विजय मिळविला आहे. त्याचबरोबर जगज्जेते जर्मनीवर मात करून त्यांनी विजेतेपदही साकार केले होते. त्यामुळे मानसिकतेच्या आघाडीवर भारतीय कुमार एक पाऊल पुढे असतील. मात्र, याच विजयावर अवलंबून न राहण्याचा सल्ला प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी दिला आहे. ते म्हणतात, ""इतिहासाचे फक्त दाखले द्यायचे असतात. त्यावर अवलंबून रहायचे नसते. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणाराच संघ जिंकत असतो. विश्‍वकरंडकासारख्या स्पर्धेत विजेतेपदाचे स्वप्न प्रत्येक संघाने बाळगलेले असते. त्यामुळे कुणालाच कमी लेखता येत नाही.'' कुमार संघाबरोबर व्यवस्थापक म्हणून असलेले वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी खेळाडूंना अल्पसमाधानी वृत्तीतून बाहेर पडण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, ""स्पेनमध्ये जिंकलो म्हणजे येथेही जिंकू, असे होत नाही. भारतीय खेळाडूंनी विजय मिळवायचा असेल, तर डोक्‍याने खेळायला हवे; तसेच ठरवलेले नियोजन मैदानात तंतोतंत अमलात आणायला हवे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने आपल्याला धडा मिळाला आहे. प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची संधीच मिळू द्यायची नाही.''

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताने अशा अनेक संधी निर्माण केल्या होत्या; पण त्याचा फायदा उठवण्यात त्यांना अपयश आले होते. या चुका त्यांना पुन्हा करून चालणार नाहीत.

अन्य उपांत्यपूर्व लढती
बेल्जियम वि. अर्जेंटिना
जर्मनी वि. इंग्लंड
ऑस्ट्रेलिया वि. नेदरलॅंड्‌स

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साधी आणि सरळ हॉकी खेळणे आवश्‍यक होते. तेच आम्ही केले नाही. बाद फेरीत आम्ही आता तसाच खेळ करू.
हरेंद्र सिंग, भारतीय संघाचे प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com