भारताने हॉकी मालिका बरोबरीत सोडवली 

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय मिळविला. या विजयाने भारतीय महिलांनी पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. 
 

माद्रिद (स्पेन) - कर्णधार रानी रामपाल आणि गुरजित कौर यांच्या बहारदार खेळाने भारतीय महिलांनी स्पेनविरुद्धच्या पाचव्या हॉकी सामन्यात 4-1 असा विजय मिळविला. या विजयाने भारतीय महिलांनी पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. 

मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला सुरवातीपासून आक्रमक होत्या. त्यामुळे स्पेनच्या खेळाडूंवर दडपण वाढले. चेंडूवरील ताबा आणि गोल निर्माण करण्याच्या संधी अशा सगळ्याच आघाड्यांवर त्यांनी स्पेनला मागे टाकले. 

कर्णधार राणीने 33 आणि 37व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडीवर नेले होते. त्यानंतर गुरजितने 44 आणि 50व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी वाढवली. गुरजित हिने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. सामना संपण्यास काही वेळ असताना स्पेनला एक गोल परतवण्याची संधी मिळाली. सामन्याच्या 58व्या मिनिटाला लोला रिएरा हिने हा गोल केला. 

आक्रमक खेळणाऱ्या भारतीय महिलांनी सुरवातीच्या काही मिनिटांतच तीन कॉर्नर मिळविले होते. मात्र, त्याचे गोलांत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. स्पेनची गोलरक्षक मारिया रुइज कमालीची सतर्क राहिल्यानेच भारतीय आक्रमक निराश होत होते. मात्र, आक्रमणात सातत्य राखत त्यांनी दुसऱ्या सत्रात चार मिनिटांत दोन गोल केले आणि त्यानंतर उत्तरार्धात सहा मिनिटांत आणखी दोन गोल करून आघाडी भक्कम केली. रशियाच्या बचावफळीला आज भारतीय आक्रमकांना रोखण्यात अजिबात यश आले नाही आणि हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian women begin Spain series with 0-3 defeat