भारतीय महिलांचे विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अंतिम लढतीत चिलीवर पेनल्टी शूट आउटमध्ये मात

अंतिम लढतीत चिलीवर पेनल्टी शूट आउटमध्ये मात
पश्‍चिम व्हॅकुव्हर - भारतीय महिला हॉकी संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करताना महिलांच्या वर्ल्ड हॉकी लीगच्या दुसऱ्या फेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत सोमवारी त्यांनी चिलीचे कडवे आव्हान गोलरक्षक सरिता देवीच्या भक्कम गोलरक्षणाच्या जोरावर पेनल्टी शूट आउटमध्ये 3-1 असे परतवून लावले.

भक्कम बचावाच्या आधारावर खेळला गेलेला सामना नियोजित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर शूट आउटमध्ये गोलरक्षक सविता देवीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम फेरीपर्यंत भारताच्या प्रत्येक विजयात निर्णायक भूमिका बजावणारी सविता देवी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरली. शूट आउटमध्ये सविताने सुरवातीलाच चिलीच्या किम जेकब आणि जोसेफा व्हिल्लालाबेईटिआ यांचे प्रयत्न असफल ठरवून भारताला भक्कम सुरवात करून दिली. त्यानंतर चिलीच्या कॅरोलिना गार्सिया हिने तिसरा प्रयत्न यशस्वी ठरवला; पण भारताच्या दीपिकाने जाळीचा अचूक वेध घेत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला भारतीय महिलांना पिछाडीवर राहावे लागले होते. चिलीच्या मारिया माल्डोनाडो हिने या वेळी चिलीचे खाते उघडले. सामन्याच्या सुरवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघ एक वेळ बॅकफूटवर राहिला; पण लय गसवल्यावर त्यांनी बचावाची ताकद भक्कम ठेवत चिलीची आक्रमणे फोल ठरवली. प्रतिआक्रमण करून त्यांनी चिलीच्या बचावफळीलादेखील सतर्क राहण्यास भाग पाडले. सामन्याच्या बावीसाव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, चिलीची गोलरक्षक क्‍लाऊडिया शुलर हिने तो फोल ठरवला.

विश्रांती आणि त्यानंतर तिसऱ्या सत्रापर्यंत चिलीने आपली आघाडी कायम राखली होती. भारतीय आक्रमक प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. त्यांना 41व्या मिनिटाला यश आले. या वेळी मिळालेला दुसरा पेनल्टी कॉर्नर अनुपा बार्ला हिने सत्कारणी लावत भारताला बरोबरी साधून दिली. बरोबरीनंतर अखेरच्या टप्प्यात भारतीयांच्या आक्रमणाला धार आली. विशेषतः कर्णधार राणीला रोखताना चिलीच्या बचावपटूंना शिकस्त करावी लागली. चिलीदेखील मधूनच मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत होते. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांच्या निर्णायक भूमिकेमुळेच नियोजित वेळेतील खेळ लक्षात राहिला.

पेनल्टी शूट आउटमध्ये भारताच्या गोलरक्षक सविताने पणाला लावलेले सर्वस्व कामी आले. विजेतेपदानंतर कर्णधार राणी खूपच उत्साहित दिसून आली. ती म्हणाली,""आमच्यासाठी ही आव्हानात्मक स्पर्धा होती. प्रतिकूल हवामान आणि गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे हालचालींवर मर्यादा येत होत्या. या प्रत्येक अडचणींवर आम्ही मात करून भक्कमपणे उभे राहिलो. सविताने जबरदस्त कामगिरी केली. वर्ल्ड हॉकी लीगची उपांत्य फेरी गाठल्याचा आनंद नक्की आहे.''

अंतिम सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरवातीलाच गोल स्वीकारल्यानंतर आम्ही जो काही खेळ केला, तो चांगलाच होता. सुरवातीलाच स्वीकारलेल्या गोलमुळे आम्ही प्रेरित झालो. आपल्याला विजय हवाच, अशाच विचाराने प्रत्येकीने खेळ केला. हे यश सर्वांचे आहे.
- राणी, भारतीय संघाची कर्णधार

Web Title: indian women hockey team win