भारतासमोर श्रीजेशच्या दुखापतीची चिंता

पीटीआय
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना मलेशिया आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेची सुरवात मलेशियाने पाकिस्तानला हरवून केली होती. सहाजिकच त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी मलेशिया उत्सुक असेल, तर पाकिस्तानचा ती टाळण्याचा प्रयत्न राहील.

कुआनतान (मलेशिया) : पहिल्या सामन्यापासून तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय हॉकी संघासमोर उद्या आशियाई चॅंपियन्स हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरीची लढत खेळताना कर्णधार गोलरक्षक श्रीजेशच्या दुखापतीची चिंता असेल. भारताची लढत उद्या दक्षिण कोरियाशी पडणार आहे.

बचावफळीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सुरेंदर कुमारलाही दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आल्यामुळे भारतीय संघासमोर सामन्यापूर्वीच आव्हाने उभी राहू लागली आहेत. साखळीत भारताने दक्षिण कोरियाला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर कोरियाने प्रत्येक सामन्यागणिक आपला खेळ उंचावला आहे. मलेशियाने अखेरच्या साखळी सामन्यात अगदी अखेरच्या क्षणी कोरियाविरुद्ध बरोबरी साधल्याने कोरियाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे अगदी अखेरच्या क्षणी भारताला आपल्या उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्ध्याची माहिती झाली.

भारताचे प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स म्हणाले, ""कोरिया निश्‍चितच चांगला संघ आहे. त्यांनी स्पर्धेत आपली कामगिरी उंचावली आहे. मलेशियाविरुद्धच्या सामन्यातून ते काय करू शकतात याचा अंदाज आम्हाला आला आहे. बचाव ही खरी त्यांची ताकद आहे. त्यामुळे स्पर्धेत भरात असलेले आपले आक्रमक त्यांचा बचाव कसा भेदतात यावर सामन्याचा कल अवलंबून असेल.'' श्रीजेशच्या दुखापतीची चिंता नसल्याचे सांगून ऑल्टमन्स यांनी तो उद्यापर्यंत तंदुरुस्त होण्याची आशा आहे. अगदीच तो अनफिट ठरल्यास आमच्याकडे आकाश चिकटेचा चांगला पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बचावफळीत सुरेंद्रकुमार खेळत नसला, तरी त्याचा खेळावर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""अल्पावधीत सुरेंद्रने संघातील आपली जागा भक्कम केली होती. आता आम्हाला काही बदल करावे लागतील. पण, त्याचा नियोजनावर परिणाम होणार नाही. पेनल्टी कॉर्नरवर रूपिंदरला येत असलेले यश हीच आमची खरी ताकद असेल.''

दुसरीकडे कोरियाचे जर्मन प्रशिक्षक पॉल लिसेक यांनी संघातील युवा खेळाडूंवर विश्‍वास दाखवला. ते म्हणाले, ""आम्ही काय करू शकतो, हे काल सर्वांनीच पाहिले आहे. आमच्या खेळाडूंकडून स्पर्धेथ सातत्य राखले गेले आहे. फक्त, आम्ही अधिक गोल करू शकलो नाही. त्यामुळे आमचे यश उठून आले नाही.'' आमच्या संघात जिंकण्याची क्षमता आहे. आम्ही यापूर्वी भारताविरुद्ध खेळलो आहोत. त्याचा आम्हाला नियोजन करता फायदा होईल, असे देखील त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injury to P R Sreejesh increases headache to Team India in Asian Champions Hocky