कुमार हॉकीत भारताचा "विकास'

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

लखनौ - सहकाऱ्यांच्या सदोष नेमबाजीचा विसर पाडणारी कामगिरी गोलरक्षक विकास दहियाने विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत केली. त्याने शूटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचे सलग दोन पेनल्टी शॉट्‌स रोखत भारताचा विजय साकारला. भारताची आता रविवारी अंतिम लढत बेल्जियमविरुद्ध होईल. त्यांनी सहा वेळच्या विजेत्या जर्मनीचे आव्हान परतवून लावले.

लखनौ - सहकाऱ्यांच्या सदोष नेमबाजीचा विसर पाडणारी कामगिरी गोलरक्षक विकास दहियाने विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत केली. त्याने शूटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचे सलग दोन पेनल्टी शॉट्‌स रोखत भारताचा विजय साकारला. भारताची आता रविवारी अंतिम लढत बेल्जियमविरुद्ध होईल. त्यांनी सहा वेळच्या विजेत्या जर्मनीचे आव्हान परतवून लावले.

भारतास सदोष नेमबाजीचा फटका बसणार असेच वाटत होते. सातपैकी एकच पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावलेल्या भारतास ऑस्ट्रेलियाच्या चुकांमुळेच निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत ठेवता आला होता. पेनल्टी शूटआउटवर भारताच्या पहिल्याच प्रयत्नात कर्णधार हरजित सिंगने दुसऱ्या प्रयत्नात गोल केला, त्या वेळी आव्हान खडतरच असणार असेच वाटत होते, पण विकास दहियाने प्रभावी कामगिरी केली.
राष्ट्रीय गोलरक्षक श्रीजेशच्या टिप्स लाभलेल्या विकासने मॅथ्यू बर्डचे दोनही प्रयत्न अपयशी ठरवले आणि त्यानंतर लॅशलन शार्प याला झेपावत गोलपासून रोखल्यावर श्रीजेशने स्टॅंडमध्येच उडी मारली. ते पाहून भारतीय चाहते जास्तच बेभान झाले. हरमनप्रीत सिंग, सुमीत आणि मनप्रीत (ज्युनि.) यांनी गोल करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

निर्धारित वेळेत भारताचा खेळ क्वचितच बहरला. क्रेग टॉम याने पूर्वार्धात गोल करून भारतीयांवरील दडपण वाढवले. गुरजांत सिंग आणि मनदीप सिंगने प्रत्येकी एक गोल करीत भारतास 48 व्या मिनिटास 2-1 आघाडीवर नेले. मात्र 57 व्या मिनिटास शार्पला गोल करण्याची संधी देत भारतीयांनी मोक्‍याची आघाडी दवडली होती. भारताचा खालावणारा बचाव विकास दहियाने सहा पेनल्टी कॉर्नर रोखण्यात मोलाची कामगिरी बजावत सावरला होता. मात्र आक्रमक संधी दवडत होते. ते पाहून वरिष्ठ संघातील हॉकीपटू अशा संधी दवडून कसे चालेल, असे संतप्त ट्‌विट करीत होते, पण त्याचवेळी जिंकल्यावर रुपिंदरपाल सिंगने वा छा गये मुंडे, जगज्जेतेपदापासून एकच विजय दूर हे ट्‌विट वरिष्ठ खेळाडूंच्या भावनांना शब्दरूप देत होते.

दरम्यान, बेल्जियमने जर्मनीचे या स्पर्धेतील विजेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न धुळीस मिळवले. बेल्जियमने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकून धक्का दिला होता. हीच कामगिरी त्यांच्या कुमार संघाने करीत 4-3 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kumar Hockey World Cup