हॉकी : भारताने गतविजेत्या जपानलाही हरवले 

हॉकी : भारताने गतविजेत्या जपानलाही हरवले 

काकमिगहारा (जपान) : भारतीय महिलांच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या तडाख्यातून गतविजेता जपान संघही सुटू शकला नाही. भारतीय महिलांनी शुक्रवारी जपानचा 4-2 असा पराभव करून आशिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी आता त्यांची गाठ पुन्हा एकदा चीनशी पडणार आहे. 

भारताने यापूर्वी साखळीत चीनवर विजय मिळविला होता. तसेच, 2009मध्ये याच दोन संघांत विजेतेपदाची लढत झाली होती. तेव्हा चीनने 5-3 अशी लढत जिंकली होती. मात्र, चार वर्षांनी भारताने 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूट आउटमध्ये चीनचा 3-2 असा पराभव केला होता. गेल्या स्पर्धेतील विजेत्या जपानबरोबर उपविजेत्या कोरियाचेही आव्हान या वेळी उपांत्य फेरीत संपुष्टात आले. कोरियाला चीनने 2-3 असे पराभूत केले. भारत चौथ्यांदा या स्पर्धेची अंतिम लढत खेळणार आहे. यापूर्वी 2004 मध्ये भारत विजेते आहेत, तर 1999 आणि 2009 मध्ये ते उपविजेते ठरले आहेत. 

भारतीय महिलांच्या खेळात या सामन्यातही कमालीचे सातत्य बघायला मिळाले. गुरजित कौरने स्पर्धेत आणखी (7 आणि 9 वे मिनीट) दोन गोल करून आपली गोलसंख्या आठवर नेली. नवज्योत कौर आणि लालर्रेमसिआमी यांनी एकेक गोल केला. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारताने सुरवातच मुळी वेगवान केली. पहिल्या नऊ मिनिटांतच त्यांनी धडाधड तीन गोल करून सामन्यावर पकड मिळविली. गुरजितने सातव्या मिनिटाला मिळविलेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर नववे मिनीट कमालीचे वेगवान ठरले. नवव्या मिनिटाला नवज्योतने मैदानी गोल केल्यावर, ते मिनीट संपायच्या आत गुरजितने वैयक्तिक दुसरा गोल करून संघाची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. 

जपानच्या खेळाडूंनीही चांगले प्रतिआक्रमण करून झटपट दोन गोल परतवून लावले. सामन्याच्या 17व्या मिनिटाला शिहो त्सुजी हिने पहिला गोल केला आणि नंतर 28व्या मिनिटाला युई इषीबाशी हिने मैदानी गोल करून सामन्यात रंगत आणली. घरच्या प्रेक्षकांचा वाढता पाठिंबा त्यांचा उत्साह वाढवत होता. पण, भारतीय खेळाडूंच्या आक्रमकतेसमोर तो कधी मावळला हे त्यांनाही समजले नसेल. सामन्याच्या 38व्या मिनिटाला लालर्रेसिआम हिने गोल करून भारताचा जणू विजयच निश्‍चित केला. जपान संघही 2-4 अशा मोठ्या पिछाडीनंतर दडपणाखाली राहिला. 

विश्‍वकरंडकाच्या थेट प्रवेशासाठी 
या स्पर्धेची अंतिम लढत आता भारत-चीन यांच्या दरम्यान होणार आहे. साखळीत भारताने चीनवर 4-1 असा विजय मिळविला आहे. गेल्या स्पर्धेतही चीनला हरवून महिलांनी ब्रॉंझपदक मिळविले आहे. या वेळी मात्र त्यांच्यात अंतिम लढत होणार आहे आणि विजेता संघ 2018च्या विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com