पहिल्या दिवसापासून याची तयारी होती - ऑल्टमन्स

पीटीआय
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघासोबत साडेचार वर्षं प्रवास केल्यानंतर अचानक हकालपट्टी करण्यात आलेल्या प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी ‘नवीन काही नाही. जबाबदारी मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून याची तयारी ठेवली होती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघासोबत साडेचार वर्षं प्रवास केल्यानंतर अचानक हकालपट्टी करण्यात आलेल्या प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी ‘नवीन काही नाही. जबाबदारी मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून याची तयारी ठेवली होती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

भारतीय हॉकी संघ आणि परदेशी प्रशिक्षक यांचे नाते वाटते तेवढे जवळचे नाही, या मार्गात अनंत अडचणी असल्याचे सांगून ऑल्टमन्स म्हणाले, ‘‘भारतीय हॉकी महासंघाचे पदाधिकारी आणि प्रशिक्षक यांच्यात कायमच मतभेद असतात. त्यांना मिळणारी वागणूक ही नोकरशाहीसारखी असते. यात माझाच बळी गेला असे नाही, तर यापूर्वीच्या प्रत्येक परदेशी प्रशिक्षकाला असेच मुदतीपूर्वी हटविण्यात आले.’’

भारतीय संघाला प्रशिक्षक असतानाच हॉकी इंडियाने ऑल्टमन्स यांची सुरवातीला हाय परफॉर्मन्स संचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर प्रशिक्षकाची वाढती जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच ती निभावली. हकालपट्टी झाल्यानंतर ते म्हणाले, ‘‘भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणे सोपे नाही, असे प्रत्येक प्ररदेशी  प्रशिक्षकाचे म्हणणे आहे. मुळात संघटनेकडे उद्दिष्ट नाही, तर ते खेळाडूंमध्ये काय उतरवणार, असा प्रश्‍न भारतात क्रिकेट सोडून प्रत्येक खेळात दिसून येतो. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली असली, तरी पहिल्या दिवसापासून आपली कधीही हकालपट्टी होऊ शकते हे जाणून होतो. त्यामुळेच मला निर्णयाचे आश्‍चर्य वाटले नाही.’’

भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्याचा आपल्याला पश्‍चातापही वाटत नाही, असे सांगून ऑल्टमन्स म्हणाले, ‘‘मला पश्‍चाताप वगैरे काही वाटत नाही. मी भारतीय संघाला योग्य दिशा दाखवली आणि योग्य मार्गावर आणून ठेवल्याचा मला विश्‍वास आहे. या मार्गावरून चालले तरी भविष्यात भारतीय हॉकीची प्रगती कायम राहू शकते.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey Roelant Oltman