भारताचा ऑस्ट्रियावर विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

दहा सेकंद असताना गोल; युरोप हॉकी दौऱ्याची यशस्वी सांगता
मुंबई - भारतीय हॉकी संघाने युरोप दौऱ्याची यशस्वी सांगता करताना माजी भारतीय मार्गदर्शकाच्या संघाचे कडवे आव्हान परतवले. भारताने युरो स्पर्धेची पूर्वतयारी करीत असलेल्या ऑस्ट्रियास ४-३ असे पराजित केले. रमणदीप व चिंगलसेनासिंग यांनी प्रत्येकी दोन गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

ॲमस्टरडॅममध्ये युरो हॉकी स्पर्धा होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी ऑस्ट्रियाने ॲमस्टलविनमध्ये भारत - ऑस्ट्रिया लढत घेतली होती. ऑस्ट्रियास भारताचे माजी मार्गदर्शक सेड्रिक डिसूझा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अर्थात सध्याच्या हॉकी संघातील एखाद्याही खेळाडूस त्यांचे मार्गदर्शन लाभले असण्याची शक्‍यता कमी आहे. अवघी दहा सेकंद शिल्लक असताना चिंगलसेनासिंग याने अप्रतिम गोल करीत भारतास हा विजय मिळवून दिला. 

नेदरलॅंडस्‌विरुद्धच्या सलग दोन विजयांनी आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारताने सुरवात चांगली केली होती. चेंडूवर हुकमतही होती; पण ऑस्ट्रियाचा बचाव चांगला होता. त्यांची प्रतिआक्रमणे भारतास सतावत होती. याच जोरावर त्यांनी पहिल्या सत्रात आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या सत्रात अमित रोहिदासच्या पासवर रमणदीपने भारतास बरोबरी साधून दिली.
मध्यांतराच्या दहा मिनिटांच्या ब्रेकनंतर भारतीय जास्त आक्रमक झाले. गोलक्षेत्रात भारतीयांची हुकूमत जास्त वाढली. रमणदीपने ३२ व्या मिनिटास भारतास आघाडीवर नेले. दोन मिनिटांत मनदीपने पेनल्टी कॉर्नर दवडला; पण तीनच मिनिटांत मनदीपच्या चालीवर चिंगलसेनाने भारताचा तिसरा गोल केला. 

अखेरचे सत्र सुरू झाल्यावर ऑस्ट्रियन जास्त आक्रमक झाले. त्यांनी तीन मिनिटांत दोन गोल करीत बरोबरी साधली. हीच बरोबरी कायम राहणार, असे वाटत असतानाच रमणदीप-गुरजांत यांची चाल चिंगलसेनाने सत्कारणी लावत भारतास विजयी केले. या युरोप दौऱ्यात बेल्जियममधील दोन पराभवांनंतर भारताने नेदरलॅंडस्‌मधील तीन लढती जिंकल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india win in hocky competition