‘ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतविण्याची भारताची क्षमता’

यूएनआय
बुधवार, 28 मार्च 2018

हॉकी लीगमुळे भारतीय खेळाडूंना अनेक परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांच्या खेळाची ओळख त्यांना झाली. लीगमधील अनुभव नक्कीच खेळाडूंना फायद्याचा ठरत आहे.
- झफर इक्‍बाल,  माजी हॉकी कर्णधार

नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाची सध्याची तयारी लक्षात घेता मनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतविण्याची क्षमता असल्याचे मत माजी ऑलिंपियन झफर इक्‍बाल यांनी व्यक्त केले. 

भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलिया संघ सध्याचा सर्वोत्तम संघ आहे, यात शंका नाही. पण भारतीय संघही काही कमी नाही. त्यांनी अलीकडे आपल्या कामगिरीतून ती झलक दाखवून दिली आहे. हा संघ ऑस्ट्रेलियाचाही अडथळा सहज पार करू शकतो, असा मला विश्‍वास आहे.’’

भारतीय संघाला २०१० आणि २०१४ अशा सलग दोन राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच सुवर्ण लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. 

आव्हानात्मक संघ
राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाखेरीज अन्य संघही आव्हानात्मक असल्याचे मत त्यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान हे संघही क्षमता राखून आहेत. पण आपल्या संघाची तयारी चांगली झाली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ अलीकडे खूप सामने खेळले आहेत. त्याचा त्यांना निश्‍चित फायदा होईल.

भारतीय संघाविषयी
भारतीय संघाची निवड झाली तेव्हा अनुभवी सरदारला वगळण्यावरून चर्चा झाली होती. पण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अझलन शाह स्पर्धेत चमक दाखवू शकला नाही, हा मुद्दा उपस्थित करत झफर इक्‍बाल यांनी सरदारला वगळण्याचा निर्णय बरोबर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘खेळाडूंमध्ये समन्वय राखणे आणि मैदानात नियोजन अमलात आणणे ही कर्णधाराची जबाबदारी असते. यात सरदार कमी पडला. एखाद्या मोठ्या स्पर्धेत संघ निवडला जातो तेव्हा तो सर्वोत्तम कामगिरी कणारा असायला हवा. हा विचार बघता राष्ट्रकुलसाठी निवडलेले दोन्ही संघ सर्वोत्तम आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zafar Iqbal Former Hockey Captain india