दृष्टिहीन मुली कॉमनवेल्थ गाजवणार 

संदीप जगदाळे 
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले.

पुणे - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले. स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ऑलिंपिक स्पर्धेत भरारी घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. 

सोनाली व रेणुका "सकाळ'शी बोलताना म्हणाल्या, ""आई-वडिलांची व पुणे अंधशाळेची साथ हा आमच्यासाठी मोठा आधार आहे. सुप्तगुणांच्या विकासासाठी शाळा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपर्यंत पोचू शकतात. स्पर्धेत यशप्राप्तीसाठी जिद्द, मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी हवी. खेळामुळे सहकार्याची भावना; तसेच स्वसंरक्षणाचे धडे मिळतात. 

उस्मानाबादची रेणुका ही दहावी उत्तीर्ण आहे. वडील खासगी कंपनीत चालक असून आई गृहिणी आहे. सोनाली ही संगमनेर येथील असून ती दहावीची परीक्षा देणार आहे. आई-वडील शेती करतात. मुलींची स्पर्धेत निवड झाल्याने पालक भारावून गेले आहेत; तसेच मैत्रिणी, शिक्षकांनाही त्यांचे कौतुक वाटते. 

पालक नारायण साळवे म्हणाले, ""माझी मुलगी आंतरराष्ट्रीय खेळात सहभागी होईल, असे वाटले नव्हते. एका चालकाची मुलगी इंग्लंडमध्ये खेळण्यास जात आहे, याचा कुटुंबाला अभिमान वाटतो.'' 

ज्यूदो प्रशिक्षक रचना धोपेश्वर म्हणाल्या, ""पाच वर्षांपासून सोनाली व रेणुका यांना मोफत प्रशिक्षण देत आहे. एक चॅलेंज म्हणून मी हे काम स्वीकारले. त्या सामान्यांपेक्षा त्या चांगल्या पद्धतीने ज्यूदो खेळतात. कॉमनवेल्थ चॅंपियनशिपमध्ये त्यांची निवड झाल्याचा मला खूप आनंद वाटतो. पुणे अंधशाळेने मला सहकार्य, प्रोत्साहन दिल्यामुळेच या मुलींची निवड स्पर्धेसाठी झाली.'' 

पुणे अंधशाळेच्या विश्वस्त मृणालिनी पवार, सचिव महेंद्र पिसाळ व मुख्याध्यापक राजाराम जगताप यांनी दोघींचा सत्कार केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blind Girl Commonwealth