निर्णायक टप्प्यात मुंबईचा खेळ खालावला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना अखेरच्या दीड मिनिटात लोण स्वीकारल्यामुळे यू मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई, ता. 28 : विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना अखेरच्या दीड मिनिटात लोण स्वीकारल्यामुळे यू मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात आज झालेल्या सामन्यात गतविजेत्या बंगळूरु बुल्सने हा सामना 30-26 अशा फरकाने जिंकला.

मुंबईला निर्णायक टप्प्यात संयम राखता आला नाही. 23-20 अशी आघाडी त्यांनी गमावली. गतस्पर्धेतील स्टार पवन शेरावतला या वेळी दिलेले दोन गुण मुंबईच्या पीछेहाटीस कारणीभूत ठरले आणि अखेर त्याचे पराभवात पर्यवसान झाले.

यू मुम्बाने 3-1 अशी आघाडी घेत चांगली सुरुवात केली होती; परंतु बघता बघता बंगळूरुने गुणांचा धडाका सुरू केला. 7-7 अशी बरोबरी झाली. या वेळी फझलही बाद झाला होता. मुंबईवर लोण पडण्याची शक्‍यता निर्माण झाली होती; परंतु नवख्या अर्जुन देशवालने गुण मिळवला आणि काही वेळातच रोहित कुमारची सुपर टॅकल करण्यात आली. अर्जुनने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. सामन्यात रंग भरले.

कमालीचा अटीतटीचा होऊ लागलेल्या या सामन्यांचा मध्यांतर 13-11 असा बंगळूरुच्या बाजूने होता. त्यानंतर मुंबईने आघाडी घेतली खरी; पण ती राखण्यात ते अपयशी ठरले.

दिल्लीची हॅटट्रिक
आजच्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीने हरियाना स्टिलर्सचा 41-21 असा पराभव करून विजयाची हॅटट्रिक केली; तर हरियानाचा दोन सामन्यातला हा दुसरा पराभव आहे. दिल्लीकडून नवीन कुमारने सुपर टेनची कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: u mumba lost crucial points and match