जागतिक विजेतीची शिबिरातून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सांघिक ब्रॉंझ पदक जिंकलेल्या मुस्कान किरार हिची राष्ट्रीय कुमार शिबिरातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सांघिक ब्रॉंझ पदक जिंकलेल्या मुस्कान किरार हिची राष्ट्रीय कुमार शिबिरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिबिरात दोन दिवस अनुपस्थित असल्याचे सांगत ही कारवाई तातडीने करण्यात आली आहे.
मुस्कान तसेच तिचे मार्गदर्शक रिचपाल सिंग यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

मुस्कान 21 ते 24 जुलैदरम्यान जबलपूरला घरी गेली होती, तर तर रिचपाल हे 23 ते 25 जुलैदरम्यान पतियाळास गेले होते. आपण कोणालाही न सांगता रोहतक येथील जागतिक युवा स्पर्धेच्या शिबिरातून निघून गेलात, त्यामुळे या शिबिरातून आपले नाव कमी करण्यात आले आहे; असे पत्र देत त्यांना शिबिरातून घरी पाठवण्यात आले.

मुस्कान हॉस्टेल वॉर्डनना सांगून घरी गेली होती. त्याचबरोबर तिने शिबिरात पुन्हा दाखल झाल्याचे पत्र तेथील केंद्रप्रमुखांना दिले होते. तरीही तिच्यावर कारवाई झाली आहे. भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव वीरेंद्र सचदेव यांनी दोघांना किमान कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी होती. रिचपाल यांनीही आपण पूर्वकल्पना देऊनच गेलो होतो असे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world bronze medallist archer asked to leave the camp