जिल्हास्तरावर फुटबाॅल स्पर्धेत दोन संघांना मिळणार हजारोंचे पारितोषिक

सिद्धार्थ लाटकर
Friday, 5 July 2019

महाराष्ट्र मिशन वन मिलियन याअंतर्गत सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फुटबॉलमय वातावरण तयार झाले आहे. यामुळे सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत निश्‍चित जास्तीत जास्त संघ सहभागी होतील अशी आशा आहे.

सातारा ः सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल क्रीडा स्पर्धेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा प्रथमच जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या दोन संघांना हजारो रुपयांचे पारितोषिक देण्याचा निर्णय नवी दिल्ली येथील सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटीने घेतला आहे. विशेष म्हणजे हे पारितोषिक 14 आणि 17 वर्षांखालील या दोन्ही वयोगटांत दिले जाणार आहे. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होण्यापूर्वी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने जिल्ह्यापासून राज्यस्तरापर्यंत सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा प्रतिनिधित्व करणारा संघ आपले कौशल्य सिद्ध करतो. यंदा (सन 2019-20) या स्पर्धेचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जिल्हास्तरावरील विजेत्या संघास रोख पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथमच जिल्हास्तरावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना रोख पारितोषिक मिळणार आहे. परंतु, त्यासाठी जिल्हास्तरावर प्रति वयोगटात किमान 50 संघांचा समावेश हवा, अशी अट घालण्यात आली आहे. त्यानुसार प्रति वयोगटात किमान 50 संघ सहभागी असल्यास विजेत्या संघास 15 हजार तसेच उपविजेत्या संघास पाच हजार, 51 ते 100 संघ सहभागी असल्यास विजेत्या संघास 35 हजार तसेच उपविजेत्या संघास 15 हजार, 101 ते 150 संघ सहभागी असल्यास विजेत्या संघास 30 हजार तसेच उपविजेत्या संघास 20 हजार, 151 पेक्षा अधिक संघ सहभागी असल्यास विजेत्या संघास 50 हजार तसेच उपविजेत्या संघास 25 हजार पारितोषिक दिले जाणार आहे. 
सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी यांच्या www.subrotocup.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. यंदाच्या स्पर्धेत एक जानेवारी 2006 अथवा त्यानंतर जन्मलेल्यांना 14 वर्षांखालील मुलांच्या वयोगटात तसेच एक जानेवारी 2003 अथवा त्यानंतर जन्मलेल्यांना 17 वर्षांखालील मुले व मुलींच्या वयोगटात सहभाग घेता येईल. नवी दिल्ली येथील सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने सन 2019-20 या वर्षातील राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल क्रीडा स्पर्धा 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर, विभागस्तरावर तसेच राज्यस्तरावर स्पर्धा होईल. 

सातारा जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण 
महाराष्ट्र मिशन वन मिलियन याअंतर्गत सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फुटबॉलमय वातावरण तयार झाले आहे. सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत निश्‍चित जास्तीत जास्त संघ सहभागी होतील, असा आत्मविश्‍वास जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी व्यक्त केला. ही स्पर्धा 15 जुलैपासून सुरू होईल. शाळा व महाविद्यालयांनी 13 जुलैपूर्वी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय येथे सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winner and runner teams will be awarded ten to 15 thousand rupees