विराट' खेळी अपयशी; विंडीज ठरले सरस

शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. गेल्या दोन सामन्यांत शतके करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विराटला तिसऱ्या सामन्यात शतक करूनही विजय मिळवून देण्यात अपयश आले. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

भारतीय सलामीवीर विंडीजच्या आव्हानासमोर चांगली सुरवात करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्माचा अवघ्या 8 धावांवर होल्डरने त्रिफळा उडविला. पहिल्या दोन सामन्यातील शतकवीर विराटने चौकार मारून आपले खाते उघडले. शिखरच्या साथीने 79 धावांची भागीदारी करत विंडीजला आणखी यश मिळू दिले नाही. पण, नर्सने शिखरचा अडसर दूर केला. शिखरला 35 धावांवर पायचीत करत भारताला दुसरा धक्का दिला. विराटने आपला फॉर्म कायम ठेवताना चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. रायडूच्या साथीनेही त्याने 47 धावा नोंदविल्या. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला रायडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. तो 22 धावांवर बाद झाला. रिषभ पंतचा पहिल्याच चेंडूवर झेल सुटला. त्यानंतर मात्र रिषभने मागे वळून न पाहता चौकार, षटकार खेचण्यास सुरवात केली. मात्र, रिषभ 24 धावांवर असताना विंडीजने यष्टीमागे झेल घेतल्याचे अपील करत विंडीजने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरविले.

पंत बाद झाल्यानंतर आलेल्या धोनीने विराटला साथ देत संघाची धावसंख्या वाढविली. धोनीला भारताकडून 10 हजार धावा करण्याची संधी होती. पण, तो अपयशी ठरला. धोनी अवघ्या 7 धावांवर बाद झाला. विराटने आपली रनमशीन कायम ठेवताना वनडे कारकिर्दीतील आणखी एक शतक आणि सलग तिसरे शतक झळकाविले. विराटने 110 चेंडूत शतक साजरे केले. दुसऱ्या बाजूने विकेट पडत असली तरी विराटने एकाबाजूने धावा करत हार मानली नव्हती. मात्र,  विंडीजने विराटविरुद्ध सॅम्युअल्स अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला आणि ते यशस्वीही झाले. सॅम्युअल्सने पहिल्याच षटकात विराटला 107 धावांवर त्रिफळाबाद केले. याठिकाणी भारताच्या आशा संपुष्टात आल्या. विंडीजच्या गोलंदाजांनी विराट वगळता एकाही खेळाडूला मैदानावर जास्त काळ टिकू दिले नाही. सॅम्युअल्सने तीन बळी घेतले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपॉल हेमराजने बुमराच्या तिसऱ्या षटकात चौकार आणि षटकार खेचून धावगती वाढविली. पण, महेंद्रसिंह धोनी का बेस्ट आहे, हे त्याने धावत जाऊन घेतलेल्या झेलवरून स्पष्ट झाले. धोनीने घेतलेला झेल अप्रतिम होता आणि त्याला प्रेक्षकांनीही तेवढीच दाद दिली. हेमराज 15 धावा करून बाद झाला. दुसऱ्या सामन्यातील शतकवीर शाई होपने सलामीवीर किरॉन पॉवेलला साथ देत धावा वाढविल्या. मात्र, मैदानाच्या दुसऱ्या बाजूने बुमराला गोलंदाजीला उतरविण्याचा निर्णय विराटने घेतला आणि तो यशस्वीही झाला. बुमराने विंडीजला दुसरा धक्का देत पॉवेलला 21 धावांवर रोहित शर्माकरवी स्लिपमध्ये झेलबाद केले. मालिकेत अपयशी ठरलेल्या सॅम्युअल्स या सामन्यातही कमाल दाखवू शकला नाही. तो धोनीकडे झेल देऊन बाद झाला.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या हेटमेरचा फॉर्म या सामन्यातही कायम होता. त्याने सुरवातीपासूनच झटपट धावा करत प्रत्येक षटकात चौकार किंवा षटकार मारत धावा केल्या. त्याला होपनेही चांगली साथ देत अर्धशतकी भागीदारी नोंदविली आणि संघाचे शतक पूर्ण केले. मात्र, कुलदीपच्या फिरकीवर तो फसला, धोनीने चतुराईने त्याला यष्टीचीत बाद केले. हेटमायरने 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 21 चेंडूत 37 धावा केल्या. त्यापाठोपाठ रोवमन पॉवेलही कुलदीपचा शिकार ठरला. पॉवेल अवघ्या 4 धावांवर बाद झाला आणि विंडीजचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार जेसन होल्डरने साथ देत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार नेली. होपने 72 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. होल्डरला 32 धावांवर बाद करून भुवनेश्वरने विंडीजची मोठ्या धावसंख्येकडे होणारी वाटचाल रोखली. शतकाकडे वाटचाल करत असलेला होपला शतक करण्यात अपयश आले. बुमराने 95 धावांवर असताना त्याचा त्रिफळा उडविला. नर्स आणि रोच यांनी अखेरच्या षटकांमध्ये काही फटके मारत संघाची धावसंख्या अडीचशेच्या पार नेत 284 धावांचे आव्हान ठेवले होते.

विराटचे शतक दृष्टीक्षेपात :
- क्रिकेट कारकिर्दीतील 62 वे (349 सामने), जॅक कॅलिसच्या 62 शतकांची बरोबरी (519 सामने)
- सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर
- वनडे कारकिर्दीतील 38 वे शतक
- वेस्ट इंडीजविरुद्ध 7 वे शतक
- वनडे क्रिकेटमध्ये 59.90ची सरासरी
- सलग तीन शतके झळकाविणारा पहिला भारतीय
- सलग तीन शतके करणारे जगात फक्त 10 खेळाडू
- सलग चार शतके झळकाविण्याचा मान कुमार संगकाराकडे

संक्षिप्त धावफलक : 
वेस्टइंडीज 50 षटकांत 9 बाद 283 (कायरन पॉवेल 21 - 25 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, चंद्रपॉल हेमराज 15, शाई होप 95 - 113 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, शिमरॉन हेटमेर 37 - 21 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, जेसन होल्डर 32 - 39 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, ऍशले नर्स नाबाद 40 - 22 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, भुवनेश्वर कुमार 1-70, जसप्रीत बुमरा 4-35, खलील अहमद 1-65, युझवेंद्र चहल 1-56, कुलदीप यादव 2-52) विजयी वि. भारत 47.4 षटकांत सर्वबाद 240 (शिखर धवन 35 - 45 चेंडू, 5 चौकार, विराट कोहली 107 - 119 चेंडू 10 चौकार, 1 षटकार, अंबाती रायडू 22, रिषभ पंत 24, जेसन होल्डर 2-44, ओबेड मॅकॉय 2-38, ऍशले नर्स 2-43, मार्लोन सॅम्युअल्स 3-12)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Indies beat India by 43 runs to level series 1-1