dnyanesh bhure
dnyanesh bhure

World Cup 2019 : एकदिवसीय क्रिकेट ते विश्‍वकरंडक (ज्ञानेश भुरे)

क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती नक्कीच केली आहे. हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे या खेळाची होणारी विश्‍वकरंडक स्पर्धा आता काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. स्पर्धादेखील क्रिकेटच्या जन्म देशात म्हणजे इंग्लंडमध्ये होणार आहे. म्हणूनच म्हटलं, जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊन येऊ. क्रिकेट, विश्वकरंडक स्पर्धेचे वर्तमान जितके उत्कंठावर्धक आहे तितकाच त्याचा इतिहास रंजक आहे.

विश्वकरंडक स्पर्धेच्या वलयाविषयी वेगळे सांगायला नको. ही स्पर्धा जिंकणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जग जिंकल्याचा अनुभव असतो. ऑलिंपिकमध्ये जसे पदक जिंकल्याचा आनंद खेळाडूला होतो, अगदी तसाच आनंद येथे खेळाडूला होत असतो. विश्वकरंडक हातात घेऊन मिरवणे याच्यासारखे स्वर्गसुख खेळाडूला नसते. इतकी ही महत्त्वाची स्पर्धा असते. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा हे क्रिकेटच्या आधुनिकीकरणाचे पहिले पाऊल. खरे क्रिकेट हे पाच दिवसांचे. कसोटी क्रिकेट नावाने ओळखले जाते. मुळात क्रिकेट हा राजेशाही खेळ. ही राजेशाही म्हणजे इंग्लंडमधील किंवा त्यांच्या वर्चस्वाच्या परंपरेतील. इंग्रजांनी ज्या देशांवर राज्य केले तेच बहुतांश देश क्रिकेट खेळताना दिसतात. म्हणजे इंग्रज गेले, पण क्रिकेटच्या रुपाने ते आपला वारसा ठेवून गेले. अगदी राजेशाही थाटात म्हणजे त्यांच्या वेळेनुसार सुरवातीला क्रिकेट खेळले जायचे. पुढे काळ बदलला, राजघराणी खालसा झाली, जगण्याला एक वेगळा वेग आला. या वेगवान जगाला हा राजेशाही वेग काही आवडेनासा झाला. अगदी सुरवातीला 1960 च्या दशकात तीन दिवसांचे क्रिकेट खेळले जायचे. हळूहळू सामने पाच दिवसांचे होऊ लागले. कधी कधी निकाल लागेपर्यंत थांबायचे ठरले, तर सामना सात-आठ दिवसांपर्यंत खेळला गेल्याचे इतिहासाची पाने चाळताना आढळते. पण, पाच दिवसही खेळून सामने अनिर्णित राहू लागल्याने मैदाने प्रेक्षकांअभावी रिकामी पडू लागली. कसोटी क्रिकेट खरे असले, तरी त्याची अवस्था आज पूर्वीपेक्षा अधिक भयाण झाली आहे. कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी अनेक कल्पना शोधल्या जात आहेत. कसोटी क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा ही प्रत्यक्षात न उतरलेली कल्पना आता या एकदिवसीय स्पर्धेनंतर प्रत्यक्षात उतरणार आहे. पण, क्रिकेटला वाचविण्याचे काम केले ते एकदिवसीय क्रिकेटने.

एकदिवसीय क्रिकेटचा उदय
आजही क्रिकेटशी जवळचे नाते असणाऱ्या जिलेट या दाढीचे ब्लेड आणि फोमचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडेच एकदिवसीय क्रिकेट सुरू करण्याचे पहिले श्रेय जाते. क्रिकेटकडे पाठ फिरविलेल्या प्रेक्षकांना परत कसे वळवायचे यासाठी नियुक्त केलेल्या समितीने इंग्लंड क्रिकेट मंडळासमोर मर्यादित षटकांच्या सामन्याचा प्रस्ताव ठेवला. जिलेट कंपनीला हा प्रस्ताव आवडला आणि त्यांनी अशी एखादी स्पर्धा पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला. साधारणपणे 60 च्या दशकात 1963 मध्ये इंग्लंड कौंटी संघांमध्ये अशी एक स्पर्धा झाली. एकदिवसीय क्रिकेटची ती पहिली स्पर्धा. या स्पर्धेपासून स्फूर्ती घेत पुढे अनेक स्पर्धा निर्माण झाल्या. "प्लेअर ऑफ संडे लीग', "बेन्सन अँड हेजेस' या यातील काही महत्त्वाच्या स्पर्धा. प्रगती, संशोधन इतक्‍यावरच थांबले, तर त्याला संशोधन कशाला म्हणयाचे. ऑस्ट्रेलियातील एका टीव्ही वाहिनीचा निर्माता असणाऱ्या केरी पॅकर या धनाढ्याच्या डोक्‍यात आणखी एक भन्नाट कल्पना आली. त्याने एकदिवसीय क्रिकेटला रंगीबेरंगी केले. त्याने हे क्रिकेट रात्री खेळायला सुरवात केली. आज दिवसा खेळले जाणारे एकदिवसीय क्रिकेटही लाल-पांढरे नसते. क्रिकेटला असे इस्टमनकलर करण्याचे श्रेय पॅकर यांनाच जाते. त्यांचे क्रिकेट त्या वेळी पॅकर सर्कस म्हणून ओळखले जायचे. या क्रिकेटमध्ये असलेला 30 यार्डातील क्षेत्ररक्षणाचा नियम, चिअर्स गर्ल (अजून टी-20 पर्यंत मर्यादित) हे सगळे बदल पॅकरचेच.

विश्वकरंडक स्पर्धा
आजचे क्रिकेट सामन्यांचे नियोजन, आखणी ही वाहिन्यांच्या नुसार केली जाते. याचा जनकही पॅकरच होता. मुळात तो त्या वेळचा माध्यम सम्राट होता असे म्हटले तरी चालेल. त्याने सगळे बदल छोटा पडदा आणि त्या भोवती असणारे प्रेक्षक बघूनच केला. पॅकरने क्रिकेटला छोटे केले म्हणजे त्याने फूल पॅंटमधून थ्री-फोर्थ घालायला शिकवले. पण, अलीकडे थ्री-फोर्थही मागे पडले आणि हाफ पॅंट आली. म्हणजे टी-20 क्रिकेट. असो, पॅकर क्रिकेटचे वेड अनेक वादविवादांमधून देशांतर्गत क्रिकेटपर्यंत पोचले. अर्थात हेसुद्धा अपघातानेच घडले. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्या दरम्यान ऍशेस मालिकेतील एक साना रद्द झाला. प्रेक्षक निराश झाले. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा काढून टाकण्यासाठी दोन्ही संघांत एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. या सामन्याला झालेली गर्दी बघता एकदिवसीय क्रिकेटला दुर्लक्षित करून चालणार नाही याची जाणीव सगळ्यांनाच झाली. त्यानंतर या दोन देशांदरम्यान 55 षटकांच्या मालिकेचेही आयोजन करण्यात आलं. पुढे जाऊन प्रुडेन्शियल कंपनीने पुढाकार घेऊन इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक संघासाठी अशा मालिका पुरस्कृत केल्या आणि यातूनच त्याला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकटे स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले. या आंतरराष्ट्रीय सामन्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या स्वरूपातील क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा घेण्याची संकल्पना पुढे आली आणि ती आतंरराष्ट्रीय क्रिकेट समितीने मान्यदेखील केली. प्रुडेन्शियल कंपनीच्या आर्थिक साहाय्याने 1975 मध्ये पहिली विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. 7 ते 21 जून 1975 दरम्यान खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत सहा कसोटी क्रिकेट खेळणारे देश आणि दोन सहयोगी सदस्य देश अशा आठ संघांमध्ये ही स्पर्धा पार पडली. एकदिवसीय क्रिकेट हे फॅड नव्हे, तर क्रिकेटचे नवे रुप असल्याचे जगजाहीर झाले.

दर चार वर्षांनी
दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन होऊ लागले. प्रत्येक स्पर्धेगणिक नवे नियम आले. हळूहळू हे नियम बदलत गेले. असे नियम करताना खेळ वेगवान करण्याची कारणे दिली गेली. मात्र, जिंकण्यासाठी काहीही (एव्हरी थिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर). क्षेत्ररक्षणावर मर्यादा आल्या, गोलंदाजांवर बंधने आली, लेग स्टम्पबाहेर टाकलेला चेंडू फलंदाजाला खेळायला कठीण जातो हे पाहून तसा चेंडू टाकणे रूढ झाले, पुढे कालांतराने असा चेंडू वाईड ठरू लागला. पण, जिंकण्यासाठी काही पण करताना मजल कुठपर्यंत पोचली पाहा. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार आवश्‍यक होता. षटकार मिळू नये म्हणून ऑस्ट्रेलियचा कर्णधार ग्रेग चॅपेल याने गोलंदाजी करणारा आपला भाऊ ट्रेव्हर चॅपेल याला अंडरआर्म चेंडू टाकायला लावला. त्या वेळी अंडर आर्म चेंडू टाकू नये असे कुठलाही नियम नव्हता. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ समजला जातो. पण, जिंकण्यासाठी त्याला असभ्यपणाची जोड दिली जाईल हे तोपर्यंत कुणाच्याही लक्षात आले नाही. एकदिवसीय क्रिकटेचा जन्म हा आक्रमक क्रिकेट आणि हमखास निर्णय यासाठी झाला. पण, खेळाडूंच्या अशा वृत्तीमुळे यात नकारात्मकतेची भीती वाढू लागली आणि मग खेळाच्या नियमात बदल होत गेले. सहलदल्य देशांच्या संख्येत वाढ झाली, ओघाने सामन्यांची संख्या वाढली. या सगळ्याची आर्थिक गणिते आधी एकदिवसीय आणि पुढे जाऊन विश्वकरंडक स्पर्धेने सोडविली. विश्वकरंडक स्पर्धा एखाद्या सण किंवा उत्सवासारखी आयोजित केली जाते. सत्तरच्या दशकापर्यंत उपखंडात पाहुणा असलेल्या क्रिकेटने पुढे 80 च्या दशकापासून येथील आपली पाळेमुळे घट्ट करण्यास सुरवात केली. ही पाळेमुळे इतकी घट्ट झाली की जणू क्रिकेटचे बीज येथेच रोवले गेले की काय असा भास वाटू लागला. उपखंडातील लोकप्रियतेमुळे पैसादेखील पाण्यासारखा वाहू लागला. या पैशाच्या नदीचा उगम भारतात होता.

भारताचा उदय
पहिल्या तीन स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या. पहिल्या दोन स्पर्धा वेस्ट इंडीजने जिंकल्या. 1983 मध्ये मात्र भारताने सर्वांना चकित केले. क्रिकटेच्या शाळेत असणाऱ्या भारताने एकदम डबल ग्रॅज्युएशन पूर्ण केले. या एका विजयाने भारतातील वातावरण बदलले. चार वर्षांनंतर होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनापर्यंत भारताने झेप घेतली. त्यांना पाकिस्तानची साथ मिळाली. भारतातील ही स्पर्धा म्हणजे क्रिकेट देवाचा जणू उरुसच भासला. 83 च्या विजतेपेदाने क्रिकेटच्या नकाशावर भारताच्या नावाचा उदय झाला. तर 87 च्या स्पर्धेने जगमोहन दालमिया हा महत्त्वाकांक्षी मुत्सदी क्रिकेटच्या व्यवस्थापनात उदयास आला. त्याने अवघ्या एका मताने 1996 च्या स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा भारताकडे खेचून आणले. इंग्लंडने या स्पर्धेसाठी जोर धरला होता. पण, मताच्या राजकारणात दालमियांनी जगाच्या नकाशावर भिंगाने शोधता येईल अशा जिब्राल्टर या आयसीसीच्या सहयोगी देशाचे मत विकत घेतले आणि इंग्लंडला शह दिला. विकत घेतले म्हणजे दालमिया यानी जिब्राल्टरमध्ये असणाऱ्या दहा क्रिकेट क्‍लबला प्रत्येकी एक लाख डॉलर्सची देणगी दिली. ही कृती भारताने कात टाकल्यासारखी होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यानंतर इतके श्रीमंत झाले की आयसीसीलाही त्यांनी मागे टाकले. त्या वेळी लावलेलं डॉलरचं झाड आज मनीप्लॅंटसारखे फोफावलं. त्याचे माळी अनेक बदलले, पण मनीप्लॅंट वाढतच राहिले. 2011 मधील स्पर्धेचे यजमानपदही भारताने मिळविले. तेव्हापासूनच दालमियांना डॉलरमिया असे म्हणू लागले. त्यानी एका दगडात दोन पक्षी मारले. पहिले म्हणजे विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन मिळविले आणि दुसरा पक्षी म्हणजे त्यांनी आयसीसीवरील इंग्लंडची मक्तेदारीदेखील मोडून काढली.

क्रिकेटचे टॉनिक
एकदिवसीय क्रिकेटचा जन्म एकूणच क्रिकेटसाठी टॉनिक देणारा ठरला. याचा डोस क्रिकेटला इतका मानवला की त्यामुळे कसोटी क्रिकेटही सुदृढ झाले. कसोटी सामने आता निर्णायक होऊ लागले आहेत. कसोटीतही षटकामागे पाचची धावगती राखली जाऊ लागली आहे. दिवसभरात साडेतीनशेची मजल आता सहज वाटू लागली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळले जाणारे फटके कसोटीतही स्वीकारले जाऊ लागले. चौकटीत अडकलेल्या क्रिकेटला एकदिवसीय क्रिकेटने बाहेर काढले. आता कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट याची तुलना करणं कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे क्रिकेटला अनभिषिक्त सम्राट केले. फलंदाजांचे बळ वाढविले. गोलंदाजांचे बळी चढविले. पण, त्यानंतरही हा खेळ क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतोच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com