World Cup 2019 : अब की बार किसी की भी सरकार (मुकुंद पोतदार)

mukund potdar
mukund potdar

टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन करण्यायाची संधी प्रत्येक संघाला असल्याचं चित्र दिसतं. सहभागी संघांचे कच्चे-पक्के दुवे, एकूण बलाबल याचा धावता आढावा.

क्रिकेटमधील जगज्जेते मोजण्यासाठी एका हाताची पाच बोटं पुरतात. पहिल्या दोन वेळचा वेस्ट इंडीज; त्यांची सद्दी संपवलेला, एकूण दोन वेळचा विजेता भारत; हॅटट्रिकसह सर्वाधिक पाच वेळा जिंकलेला ऑस्ट्रेलिया आणि प्रत्येकी एकदा विश्‍वकरंडक उंचावलेले पाकिस्तान अन्‌ श्रीलंका असे संघ आजवरचे मानकरी ठरलेत. इंग्लंडमधील स्पर्धेत या पाच संघांशिवाय आणखी पाच संघ सहभागी झालेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. हे स्वरूप बघता कुणालाच कुणाचंही आव्हान गृहीत धरून किंवा दुर्लक्षित करून चालणार नाही.

इंग्लंड : शकुन शुभ ठरविण्याचे आव्हान
पहिल्या तीन स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या. त्यात यजमान एकदाही जिंकला नाही. अलीकडील दोन स्पर्धांत मात्र यजमान विजेते ठरलेत. हा शकुन शुभ ठरविण्यासाठी इंग्लंडनं जय्यत तयारी केलीय. मागील स्पर्धेत गटसाखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढविल्यानंतर इंग्लंडनं इतकी भरारी घेतलीय की ते जागतिक क्रमवारीत थेट अव्वल क्रमांकावर विराजमान आहेत. इंग्लंडच्या संघात गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी चढाओढ लागली असून, यास निकोप-सकारात्मक स्वरूप आहे. संघनिवडीतील लवचिक धोरणाचा त्यांना फायदा झालाय. आयपीएल गाजविलेल्या जॉनी बेअरस्टॉ, जॉस बटलर यांना फॉर्म गवसलाय. गोलंदाजीतही नव्या दमाचा जोफ्रा आर्चर याचा पर्याय आहे. इंग्लंडला यजमान असल्याचे दडपण झुगारून स्थानिक वातावरणात खेळण्याचा फायदा उठवावा लागेल.

ऑस्ट्रेलिया : नाचक्की ते तयारी पक्की
सातत्यानं दर्जेदार खेळाडू घडविणारा संघ आजवरच्या प्रत्येक स्पर्धेत संभाव्य विजेत्यांमध्ये आघाडीवर राहिलाय. मागील स्पर्धेत मायदेशात जगज्जेतेपद जिंकल्यानंतर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाची नाचक्की झाली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चेंडू कुतरडल्यामुळे डेव्हिड वॉर्नर-स्टीव स्मिथ यांच्यावर बंदी आली. दुसरीकडं संघाचीही अधोगती झाली. मायदेशात भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर मात्र कांगारूंनी भरारी घेतली. शेरेबाजीवर (स्लेजिंग) काट मारून जंटलमन्स गेमला साजेसा खेळ करण्याचा संकल्प कांगारूंनी सोडलाय. जस्टीन लॅंगर प्रशिक्षक, तर रिकी पॉंटिंग मेंटॉर असलेल्या संघाची तयारी पक्की झाल्याचं भारत दौऱ्यातील वन-डे मालिकेत दिसून आलं. मग आयपीएलमध्ये वॉर्नर-स्मिथ जोडागोळी फॉर्मात आली. जगज्जेतेपदाचा षटकार खेचण्यासाठी कांगारूंचं पारडं जड असेल.

दक्षिण आफ्रिका : चोकर्स नव्हे मॅचविनर्स
ऑस्ट्रेलियाप्रमाणंच क्रिकेटची परिपूर्ण दर्जेदार सिस्टीम बसविलेला देश म्हणून दक्षिण आफ्रिकेचा उल्लेख केला जातो. दृष्टिकोनाच्या बाबतीत मात्र विजिगीषू नव्हे तर कचखाऊ वृत्ती असा टोकाचा फरक दिसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनापासून या संघाची मोहीम म्हणजे कागदावर दबदबा, पण मैदानावर दैवदुर्विलास अशी शोकांतिका दिसते. त्यामुळे त्यांच्यावर चोकर्सचा शिक्का बसलाय. या वेळी मात्र त्यांचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन यानं संघात 1 पासून 11 पर्यंत मॅचवीनर्स आहेत असं म्हटलंय. गेल्या 12 महिन्यांत त्यांनी एकही वन-डे मालिका गमावलेली नाही. त्यामुळे त्याच्या विधानात तथ्य आहे. अर्थात, विश्‍वकरंडकाच्या व्यासपीठावर हे करून दाखविणं हेच खरं आव्हान असेल.

न्यूझीलंड : प्रयत्नांना हवी दैवाची जोड
खेळ म्हणजे 99 टक्के प्रयत्न आणि 1 टक्का दैव (लक फॅक्‍टर) असं अमेरिकेचा टेनिसपटू पीट सॅम्प्रास याच्यासह अनेक दिग्गज क्रीडापटूंनी म्हटलं आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडं पाहिल्यानंतर हेच जाणवत. आतापर्यंतच्या स्पर्धांत उत्तरोत्तर कामगिरी उंचावणारा संघ अशी ओळख त्यांनी कामगिरीद्वारे कमावलीय. या वेळी एक पाऊल पुढे टाकत जगज्जेतेपदाला गवसणी घालण्याचा त्यांचा निर्धार असेल.

वेस्ट इंडीज : प्रतीक्षा पुनरागमनाची
सांघिक खेळातील जगज्जेत्यांची पीछेहाट कधीच होत नाही असं फुटबॉलमधील ब्राझील-जर्मनी, हॉकीत ऑस्ट्रेलिया-नेदरलॅंड्‌स यांच्या उदाहरणांवरून दिसून येतं. क्रिकेटमध्ये मात्र पहिल्या दोन वेळचा जगज्जेता वेस्ट इंडीज रसातळाला गेल्याची खंत त्यांच्याच नव्हे, तर तमाम क्रिकेटप्रेमींना वाटते. त्यांचे खेळाडू देशप्रेमी नाहीत की काय इथपर्यंत प्रश्‍न पडावा अशी स्थिती निर्माण झाली. अधूनमधून पुनरागमन केलेल्या विंडीजला मग मंडळ विरुद्ध खेळाडू वादाचा फटका बसला. या वेळी तर पात्र ठरण्यापर्यंत वेळ त्यांच्यावर आली. भारतात टी20 विश्‍वकरंडक जिंकून मात्र या संघानं पुनरागमनाची नांदी केली. आयपीएलमधील त्यांच्या खेळाडूंची कामगिरी बघता येथेही याचीच प्रचिती अपेक्षित आहे.

बांगलादेश : शिकारीस सज्ज टायगर्स
क्रिकेटमध्ये 20व्या शतकापर्यंत अ तुकडीतले आणि ढ तुकडीतले अशी विभागणी होती. बांगलादेशची ढ तुकडीतला संघ अशी ओळख होती, पण मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली या संघानं भरारी घेतलीय. उपखंडात खेळताना तर सख्खे शेजारी म्हणजे हाडवैरी अशा त्वेषानं ते खेळतात. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला जमला नाही तो भारताला हरवून दाखविण्याचा पराक्रम त्यांनी केलाय. अलीकडंच आयर्लंडमधील तिरंगी स्पर्धेत वेस्ट इंडीजला हरवून विजेतेपद मिळवीत बांगलादेशनं आपलं आव्हान नगण्य नसेल हेच दाखवून दिलंय. किमान उपांत्य फेरी गाठण्याचं ध्येय ठेवलेले बांगला टायगर्स शिकारीस सज्ज झालेत.

पाकिस्तान : बेमुदत बेभरवशी
दीर्घ काळ मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहूनही पाकिस्तानी क्रिकेटचे बेमुदत बेभरवसी असे बिरूद बदललेलं नाही. याचं कारण अमाप देशप्रेम हे त्यांचं बलस्थान आहे. क्रिकेट स्पर्धांकडं बघण्याच्या त्यांचा दृष्टिकोन उच्च असाच असतो. किमान उपांत्य फेरी, बाद फेरी, अव्वल साखळी अशी टप्प्याटप्प्याने वाटचाल करण्यावर त्यांचा विश्‍वास नसतो. 2017 मध्ये इंग्लंडमध्येच झालेली चॅंपियन्स ट्रॉफी जिंकून या संघानं आपली ताकद दाखवून दिली. सर्फराज अहमद कर्णधार असलेल्या संघानं सखोल पूर्वतयारी, प्रयोग करून मग परिस्थितीनुसार बदल केलेत. बेमुदत बेभरवशी असलेला संघ आपल्याला धक्का देता कामा नये म्हणून सर्वच संघांना सावध राहावं लागेल.

अफगाणिस्तान : सुरवातीपासून लिंबू-टींबू नाहीच
कसोटी, सहसदस्य असा दर्जा मिळाल्यानंतर भरारी घेण्यास नव्या संघांना वेळ लागायचा. बांगलादेश, झिंबाब्वेच्या बाबतीत हेच घडलं. हे संघ दीर्घ काळ लिंबूटिंबूच राहिले. झिंबाब्वेवर तर वर्ल्ड कपला अपात्र ठरण्याची वेळ ओढविली. अफगाणिस्ताननं मात्र सुरवातीपासून भरारी घेतलीय. झिंबाब्वेतील पात्रता स्पर्धा वेस्ट इंडिजला हरवून जिंकत त्यांनी दिमाखात पात्रता साध्य केली. संघनिवडीत स्थिरावलेला कर्णधार असगर अफगाण याला बदलून गुलबदीन नईबला नेमत भविष्याचा वेध घेणाऱ्या या संघाचं कौतुक करावे लागेल. रशीद खान, महंमद नबी असे त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये मातब्बरांच्या खांद्याला खांदा लावून खेळतात आणि प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करतात.

लंका : परिस्थितिजन्य पुनर्बांधणी
सर्वाधिक अनपेक्षित विश्‍वविजेते असे ज्यांना म्हणता येईल त्या श्रीलंकेनं विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी नेहमीच कसून प्रयत्न केले आहेत. एकदा विजेते, दोन वेळा उपविजेते, एकदा उपांत्य व एकदा उपांत्यपूर्व अशी त्यांची कामगिरी आहे. संघनिवडीच्या बाबतीत सर्वाधिक कठोर धोरण अवलंबिलेला देश अशी त्यांची अलीकडील ओळख आहे. त्यासाठी दिमुथ करुणारत्ने याला कर्णधार नेमण्यापासून त्यांनी परिस्थितीनुसार पुनर्बांधणी केली आहे. स्थित्यंतराची प्रक्रिया विश्‍वकरंडकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत मोक्‍याच्या वेळी पूर्णत्वास नेण्याचा त्यांना प्रयत्न राहील.

भारत : भरातील संघ भरारीसाठी सज्ज
डार्क हॉर्स ते हॉट फेव्हरीट अशी भरारी घेतलेला भारत समकालीन क्रिकेटमधील दिग्गजांमुळे विश्‍वकरंडकात सदैव संभाव्य विजेता असतो. दिग्गज फलंदाजांचे वारसदार कोण असा प्रश्‍न भारतीय क्रिकेटला भेडसावत नाही. यातील अलीकडचा दिग्गज विराट कोहली यानं जागतिक क्रिकेकटमधील दादा फलंदाज म्हणून आपलं अव्वल स्थान सप्रमाण सिद्ध केलंय. त्याचा जोश आणि महेंद्रसिंह धोनीचा होश असा संगम झालेला संघ भरारी घेण्यास सज्ज झालाय.

एकूण संघांचे ताजे संदर्भ पाहिले तर कुणालाही कुणाचंही आव्हान-अस्तित्व मोडीत काढून चालणार नाही हे नक्की. त्यामुळे अब की बार किसी की भी सरकार असे म्हणणे उचित ठरतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com