sanjay manjrekar
sanjay manjrekar

World Cup 2019 : विराटच्या संघाला चमकण्याची संधी (संजय मांजरेकर)

विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच ऑलिंपिकसारखी आहे.

मीसुद्धा विश्‍वकरंडक स्पर्धा अनुभवली आहे.. पण आता मला वाटतंय, की मी जरा चुकीच्या वेळी विश्‍वकरंडक स्पर्धा खेळलो. 1992 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेची आठवण येते. त्या स्पर्धेपूर्वी चार-पाच महिने भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये खेळत होताच आणि आम्ही नुसते मार खात होतो. त्यामुळे आमच्या सर्वांचाच आत्मविश्‍वास जरा ढासळला होता. आम्ही इतके "डाऊन' होतो, की विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू कधी झाली हे समजलंही नाही.. सलग क्रिकेट खेळत असल्याने आम्ही शारिरिकदृष्ट्या तर थकलो होतोच; पण त्याहीपेक्षा, सततच्या पराभवामुळे मानसिकदृष्ट्याही आम्ही भक्कम नव्हतो. त्यामुळे माझी कामगिरीही फार काही विशेष झाली नाही.
ब्रिस्बेनला झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत मला आठवतेय. त्या वेळी प्रेक्षक भावनिकदृष्ट्याही सामन्यांमध्ये खूप गुंतलेले असत. "भारताने सामना गमावला' म्हणजे स्वत:च्याच घरी एखादा दु:खद प्रसंग झाल्यासारखं वातावरण त्या वेळी भारतामध्ये असायचं. "वर्ल्ड कप'मध्ये आमची जी काही कामगिरी होत होती, त्यानंतर भारतात उमटणाऱ्या प्रतिक्रियांचीही जाणीव आम्हाला होती.

1996चा तो सामना
1996 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे कसोटी होती. हारलं की स्पर्धेबाहेर... विश्‍वकरंडक स्पर्धा.. . तीही घरच्या मैदानावर! यापेक्षा "परफेक्‍ट रेसिपी' दुसरी काय? बंगळूरमध्ये त्या सामन्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांचा दांडगा उत्साह आम्ही पाहिला होता. त्या उत्साहामुळेच सामन्यापूर्वीच भारतीय संघाला प्रचंड बळ मिळालं होतं. जसं शारजामध्ये पाकिस्तानला पाठिंबा मिळायचा ना, तसा त्या दिवशी आम्हाला मिळाला.. सामन्याआधी मैदानात खेळाडू सराव करतात.. त्या वेळीच आम्हाला थोडी जाणीव झाली होती, की पाकिस्तानला हा सामना कठीण जाणार आहे. कागदावर पाहायला गेलं, तर त्या वेळी पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा सरस होता. पण सामना आमच्या अपेक्षेनुसार झाला.. मस्त रंगला होता सामना.. अजय जडेजाने तो सामना आपल्याला जिंकवून दिला होता..

पण त्या सामन्याची एक आठवण अजूनही आहे. तो सामना संपता संपत नव्हता.. एका टप्प्यावर वाटत होतं, की "चला आपण जिंकलोच आता.. आता पुढच्या फेरीत जाणार! आख्ख्या देशात उत्साह असणार' वगैरे विचार डोक्‍यात सुरू होते.. पण पाकिस्तानचे एकामागून एक फलंदाज सुरूच होते.. जावेद मियांदाद असो वा राशिद लतीफ.. ते लढत होते.. त्यामुळे एका क्षणी असं वाटायला लागलं होतं, की अरे सामना संपणार कधी.. आपण जिंकणार कधी! अखेर आपण जिंकलोच.. त्या सामन्याने आमच्याकडून सगळं खेचून घेतलं होतं.. आमची एनर्जी असो वा सगळ्या भावना असो.. अशा भावना लवकर जात नाहीत मनातून.. त्याच अवस्थेत आम्ही बंगळूरहून कोलकत्याला गेलो उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी.. कदाचित भारत-पाकिस्तान सामन्याचा हॅंगओव्हर कायम होता आणि त्यातच आम्ही तो सामना खेळलो.. त्यामुळे कदाचित आम्ही अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करू शकलो नाही.

भारतीय संघाचे काय
यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत दहा संघ आहेत आणि प्रत्येक संघ प्रत्येकाशी खेळणार आहे. ही मस्त कल्पना आहे. यापूर्वी विश्‍वकरंडक स्पर्धेत गट पद्धतीनुसार सामने होत असत. पण मला एक प्रश्‍न कायम पडतो, की विश्‍वकरंडक स्पर्धेतही "आयपीएल'प्रमाणे "प्ले ऑफ'ची पद्धत का वापरली जात नाही? साखळी सामन्यांमध्येही पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांसाठी खूप संघर्ष होत असतो. कारण पहिल्या दोन संघांना अंतिम फेरीत दाखल होण्याची आणखी एक संधी मिळत असते. सध्याच्या फॉरमॅटमध्ये साखळी फेरीत कितीही चांगली कामगिरी झाली असली, तरीही अंतिम चार संघांवरच जास्त दडपण असते.

सध्याचा भारतीय संघ खरंच खास आहे. या स्पर्धेतील सर्वांत चांगला संघ भारताचा आहे. इंग्लंडचा संघ जास्त ताकदवान आहे, असे काहीजणांचे मत आहे. पण इंग्लंडने आजवर कधीही विश्‍वकरंडक जिंकलेला नाही. इंग्लंडच्या "टेम्परामेंट'वरही प्रश्‍नचिन्ह आहे. चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील फलंदाजी हा भारतीय संघाची एक कमकुवत बाजू आहे. या "वर्ल्ड कप'मध्ये एक गोष्ट विशेष आहे. कधी नव्हे ती "वर्ल्ड कप'मध्ये गोलंदाजी ही आपली मुख्य ताकद बनली आहे. आपल्या गोलंदाजांकडे विकेट्‌स काढण्याची भेदकता आहे आणि धावा रोखण्याची क्षमता दोन्ही आहे. जसप्रित बुमराह असो वा महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार असो वा युझवेंद्र चहल.. ही सगळी टीम छान आहे. हल्ली "स्लॉग ओव्हर्स'मध्ये चांगली गोलंदाजी करण्यास जास्त महत्त्व आहे. त्यामध्ये शमी भरीव कामगिरी करत आहे. भुवनेश्‍वरसारखा गोलंदाज "रिझर्व्ह'मध्ये बसेल म्हणजे विचार करा भारताची गोलंदाजी किती भक्कम आहे. भारताच्या फिरकी गोलंदाजांमुळे अलीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी सुधारली आहे. कारण हे फिरकी गोलंदाज डावाच्या मधल्या षटकात विकेट्‌स काढतात.

केदार ठरू शकेल सरप्राईझ पॅकेज
आता भारतीय संघाचा दुसरा महत्त्वाचा पैलू! हार्दिक पंड्या आणि केदार जाधव हे अष्टपैलू खेळाडू.. त्यातही, केदार हा "सरप्राईझ पॅकेज' ठरू शकतो. कारण केदार प्रामुख्याने फलंदाजीसाठी ओळखला जात असला, तरीही त्याच्या गोलंदाजीतील कौशल्याकडे फारसे कुणी लक्ष दिलेले नाही. दरवेळी केदारच्या गोलंदाजीच्या ऍक्‍शनविषयी चर्चा होते; पण रेकॉर्ड पाहाल, तर प्रत्येक वेळी त्याने सामन्यात छाप पाडली आहे. कधी त्याने मोक्‍याच्या क्षणी विकेट्‌स घेतल्या आहेत, तर कधी धावा रोखण्याची कामगिरी केली आहे. त्यात त्याच्या भरवशाच्या फलंदाजीची जोड आहे. पंड्या गोलंदाजीत किती प्रभाव टाकू शकेल, हे माहीत नाही; पण फलंदाज म्हणून जबरदस्तच आहे. आपल्याकडे इतरही फलंदाज आहेत; पण पंड्यासारखा "हिटिंग फॉर्म' सध्या दुसऱ्या कुणाकडेही नाही. लान्स क्‍लुसनरसारखा फटकेबाजी करणारा एक अष्टपैलू म्हणून हार्दिक भारतासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या या क्षमतेमुळे हार्दिकची गोलंदाजीही कधी कधी आपल्याला "झेलावी' लागणार आहे.

धोनीचा आधार
वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामना दडपणाचा असतो. त्यामध्ये शांतपणे कसं खेळायचं, हे बाकी कोणत्याही संघाला जमणार नाही. ऑस्ट्रेलिया इतक्‍या वेळा जगज्जेती झाली आहे; पण सध्याची त्यांची टीम नवी आहे. त्यामुळे बाद फेरीमध्ये त्यांच्यावरही दडपण येऊ शकतं.. धोनीच्या उपस्थितीमुळे भारतीय संघ जास्त "शांत' असेल. वर्ल्ड कपच्या मोहिमेमध्ये धोनीची सर्वांत मोठी भूमिका काय असेल, तर ती हीच! धोनी संघात असताना विराटही त्याच्यावर अवलंबून असतो.. सतत चर्चा सुरू असते.. असं अजिबात नसतं, की विराट स्वत:चंच काहीतरी करत असतो, धोनीचं ऐकत नाही वगैरे.. विराटच्या सगळ्या योजनांमध्ये धोनीचा सहभाग असतोच.

कर्णधार आणि फलंदाजही
"सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक' हे बिरुद आता कोहलीला मिळालं आहेच. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकहाती सामना जिंकविण्याचं कौशल्य त्याच्याइतकं दुसऱ्या कुणातही नाही. कर्णधार म्हणून तो आतापर्यंत तरी भारताचा सर्वांधिक यशस्वी ठरलेला नाही; पण इथे हा विचार केला पाहिजे, की "कोहलीमुळे भारताला काय मिळतं?' याचं उत्तर म्हणजे, "आपल्याला असा खेळाडू कर्णधार म्हणून लाभला आहे, की ज्याला जिंकण्याची इर्षा आहे. त्याला प्रत्येक सामन्यात जिंकायचंच असतं. तो कधीही प्रतिस्पर्ध्यापेक्षा स्वत:ला कमी लेखत नाही. हे सगळ्यांत जास्त महत्त्वाचं आहे. यापूर्वीच्या अनेक भारतीय संघांमध्ये हा एक न्यूनगंड कुठे ना कुठे दिसत असे. पण कोहली जिंकायच्या ज्या जोशात खेळतो, त्याला तोड नाही. बऱ्याचदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये डावाची मधली षटकं जरा कंटाळवाणी होतात. पण कोहली जेव्हापासून कर्णधार झाला आहे, त्या मधल्या षटकांमध्येही भारतीय खेळाडूंची "इन्टेन्सिटी' कायम असते. हेच कोहलीचे कर्णधार म्हणून सर्वांत मोठे योगदान असेल.

किसमें कितना है दम ?
ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत दाखल होणं हा काही आश्‍चर्याचा धक्का नसेल.. त्यांची गोलंदाजी "वर्ल्ड क्‍लास' आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ फॉर्ममध्ये आले, तर फलंदाजीही एकदम सुसाट असेल. ग्लेन मॅक्‍सवेल हा धोकादायक खेळाडू आहे आणि या वर्ल्ड कपमध्ये तो काहीतरी निश्‍चित करेल, असं वाटतंय. इतकी वर्षं मॅक्‍सवेलने सातत्याने धडाकेबाज कामगिरी केलेली नाही. पण यंदा तो या स्पर्धेचा "स्टार' असेल. इंग्लंडचा संघ सर्वांचाच "फेव्हरिट' आहे; पण दडपणाचा सामना ते कसा करतात, यावर त्यांची कामगिरी अवलंबून आहे. याशिवाय न्यूझीलंडचा संघही बाद फेरीत दाखल होईल. बाकीच्या संघांमध्ये वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आश्‍चर्याचा धक्का देतील, अशी अनेकांची अपेक्षा आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज फार काही कमाल करू शकेल, असे नाही. यापूर्वी कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ आताएवढा कमकुवत कधीच नव्हता. आधीच्या स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून अपेक्षा असायची आणि ते काही करायचे नाहीत. या वेळी फारशी अपेक्षा नाही. पण कदाचित त्यामुळेच त्यांच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते.
गेल्या काही वर्षांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेट्‌स घेणाऱ्या गोलंदाजांचे जास्त वर्चस्व आहे. आता परिस्थिती बदलली आहे. पाटा खेळपट्ट्या आणि स्विंग न होणारे चेंडू यामुळे वेगवान गोलंदाजांचा प्रभाव कमी झाला आहे. ते आता डावाच्या सुरवातीला आणि शेवटी धावा रोखण्यावर भर देतात. डावाच्या मधल्या षटकांमध्ये विकेट्‌स घेणारे गोलंदाज सामन्यावर नियंत्रण मिळवितात.

वर्ल्ड कप इंग्लंडमधला..
इथली मैदानं छोटी आहेत. त्यामुळे कधीही कोणताही संघ जिंकू शकतो. एखाद्‌ दुसरा फलंदाज स्थिरावला, की छोट्या मैदानांमुळे "पॉवर हिटिंग'ला जास्त महत्त्व मिळणार आहे. हे जुनं इंग्लंड नाही. इथे आता पांढरा चेंडू फारसा स्विंगही होत नाही. खेळपट्ट्यांमध्येही फारसे काही नसेल. "इंग्लंड म्हणजे फलंदाजांसाठी कठीण काम' वगैरे गृहीतक आता इथे लागू होणार नाही. "छोटी मैदाने' हाच कुठल्याही संघाच्या योजनांमधील महत्त्वाचा भाग असेल. त्यामुळे संघात फिरकी गोलंदाजांना जरा अधिक विचार करूनच स्थान दिले जाईल. पण इथे फिरकी गोलंदाजांना मदतही मिळेल. कारण इंग्लंडमध्ये मैदानांमधील ड्रेनेज सिस्टिमवर भर दिला गेला आहे. त्यामुळे खेळपट्ट्याही अनेकदा कोरड्या असतात.

सरते शेवटी मी इतकेच सांगेन की विराटच्या संघाला चमकण्याची संधी आहे.

(शब्दांकन : सुनंदन लेले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com