ब्रिटनच्या अँडी मरेच्या कारकिर्दीचा शेवट पराभवाने!

वृत्तसंस्था
Monday, 14 January 2019

सिडनी : ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अँडी मरेच्या देदिप्यमान कारकिर्दीचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत झाला. स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टाने मरेवर 6-4, 6-4, 6-7(5), 6-7(4), 6-2 असा पाच सेटमध्ये पराभव केला. 

सिडनी : ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अँडी मरेच्या देदिप्यमान कारकिर्दीचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत झाला. स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टाने मरेवर 6-4, 6-4, 6-7(5), 6-7(4), 6-2 असा पाच सेटमध्ये पराभव केला. 

ऑस्ट्रेलियन ओपनला सुरवात होण्यापूर्वीच अँडी मरेने एका पत्रकार परिषदेमध्ये कारकिर्दीचा शेवट करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. 'विंबल्डनद्वारे सांगता करण्याची इच्छा आहे; पण दुखापतींमुळे विंबल्डन खेळू शकेन की नाही, याबाबत साशंक आहे. त्यामुळे कदाचित ऑस्ट्रेलियन ओपनच माझी शेवटची स्पर्धा ठरू शकते', असे मरेने म्हटले होते. अर्थात, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये मरेने निवृत्तीबाबत अद्याप ठाम निर्णय झाला नसल्याचेही सांगितले. 

हा सामना तब्बल चार तास नऊ मिनिटे चालला. मरेने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी पाच वेळा गाठली होती. त्यामुळे शेवटच्या स्पर्धेतही अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीची त्याला अपेक्षा होती. पण बटिस्टाच्या झुंजार खेळीमुळे मरेला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. 

'कदाचित मी पुन्हा एकदा कोर्टवर उतरू शकेन. हे शक्‍य होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. पण मला एका मोठ्या शस्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून सावरून पुन्हा कोर्टवर उतरता येईल की नाही, हे कुणालाच सांगता येणार नाही. पण मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न नक्कीच करणार आहे', अशा शब्दांत मरेने सामन्यानंतर भावना व्यक्त केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andy Murray crashes out of Australian Open Tennis