व्हीनस, अँजेलिक, फेडररचा धडाका

पीटीआय
Saturday, 21 January 2017

मेलबर्न - व्हीनस विल्यम्स, अँजेलिक केर्बर आणि रॉजर फेडरर यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धडाका कायम राखताना वेगवान विजय मिळविले.

व्हीनसने चीनच्या यिंग-यिंग डुआनला एकाच गेमच्या मोबदल्यात गारद केले. तिने दुसरा सेट लव्हने जिंकला.

गतविजेत्या अँजेलिकला अखेर फॉर्म गवसला. तिने क्रिस्टिना प्लिस्कोवाला चार गेमच्या मोबदल्यात हरविताना पहिला सेट लव्हने जिंकला. पहिल्या दोन फेऱ्यांत अँजेलिकला तीन सेटमध्ये झगडावे लागले होते.

मेलबर्न - व्हीनस विल्यम्स, अँजेलिक केर्बर आणि रॉजर फेडरर यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धडाका कायम राखताना वेगवान विजय मिळविले.

व्हीनसने चीनच्या यिंग-यिंग डुआनला एकाच गेमच्या मोबदल्यात गारद केले. तिने दुसरा सेट लव्हने जिंकला.

गतविजेत्या अँजेलिकला अखेर फॉर्म गवसला. तिने क्रिस्टिना प्लिस्कोवाला चार गेमच्या मोबदल्यात हरविताना पहिला सेट लव्हने जिंकला. पहिल्या दोन फेऱ्यांत अँजेलिकला तीन सेटमध्ये झगडावे लागले होते.

फेडररचा धडाका
रॉजर फेडररने चेक आव्हानवीर टोमास बर्डीच याला तीन सेटमध्येच हरवीत धडाका कायम राखला. दहावा मानांकित बर्डीच फेडररची कसोटी पाहण्याची अपेक्षा होती, पण तो ९० मिनिटेच तग धरू शकला. फेडररने तब्बल ४० वीनर्स मारले.

इव्हान्सचा टॉमिचला धक्का
डॅन इव्हान्सने बर्नार्ड टॉमिचला तीन सेटमध्येच धक्का दिला. अँडी मरेने यापूर्वीच उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे १६ वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनच्या दोन खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी २००१ मध्ये टीम हेन्मन आणि ग्रेग रुसेड्‌स्की यांनी अशी कामगिरी केली होती.

दुसरीकडे पुरुष एकेरीत यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. इव्हान्सने याआधी सातव्या मानांकित मरिन चिलीचला गारद केले होते. मरेने सॅम क्‍युरीचे आव्हान तीन सेटमध्येच परतविले.

सानिया विजयी
दुहेरीत सानिया मिर्झाने चेक प्रजासत्ताकाच्या बार्बरा स्ट्रीकोवा हिच्या साथीत तिसरी फेरी गाठली. त्यांनी समंथा स्टोसूर (ऑस्ट्रेलिया)- शुआई झॅंग (चीन) यांना ६-१, ६-४ असे हरविले. हा सामना एक तास २१ मिनिटे चालला. सानिया-बार्बराने पहिले चार गेम जिंकत ४-० अशी आघाडी घेतली. आता त्यांची जपानच्या इरी होझूमी-मियू कातो यांच्याशी लढत होईल. दुसऱ्या सेटमध्ये सानियाने सर्व्हिस गमावल्याने ०-३ अशी पिछाडी होती, पण तिने बार्बरासह ती भरून काढली. अखेरचा गेम १३ मिनिटे चालला. त्यात सानिया-बार्बराने पाच ब्रेकपॉइंट वाचविले. चौथ्या मॅचपॉइंटवर त्यांनी विजय साकार केला.

बोपण्णाचा पंचांशी वाद
रोहन बोपण्णा आणि उरुग्वेचा पाब्लो क्‍युव्हाज यांचा मात्र दुसऱ्याच फेरीत पराभव झाला. त्यांना ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्‍स बोल्ट-ब्रॅडली मौस्ली यांनी २-६, ७-६ (२), ६-४ असे हरविले. बोपण्णा-क्‍युव्हाजला १५वे मानांकन होते, तर प्रतिस्पर्धी जोडी बिगरमानांकित होती. ही लढत एक तास ५५ मिनिटे चालली. निर्णायक सेटमध्ये बोपण्णाचा पंचांशी वाद झाला. बोल्टने फटका मारल्यानंतर चेंडू बोपण्णाच्या रॅकेटला लागून बाहेर गेल्याचा कौल पंचांनी दिला. त्यावर बोपण्णाने वाद घातला. तो पंचांना म्हणाला, की कुणालाच चेंडू लागल्याचे दिसले नाही, फक्त तुम्हालाच.... त्यामुळेच मला धक्का बसला आहे.

निकाल (तिसरी फेरी) ः 
महिला एकेरी ः कोको वॅंडेवेघे (अमेरिका) विवि युजेनी बुशार्ड (कॅनडा) ६-४ ३-६ ७-५. अँजेलिक केर्बर (जर्मनी १) विवि क्रिस्टिना प्लिस्कोवा (चेक) ६-० ६-४. मोना बार्थेल (जर्मनी) विवि ॲश्‍लेग बार्टी (ऑस्ट्रेलिया) ६-४ ३-६ ६-३. अनास्ताशिवाय पावल्यूचेन्कोवा (रशिया २४) विवि एलिनी स्विटोलीना (युक्रेन ११) ७-५ ४-६ ६-३. व्हिनस विल्यम्स (अमेरिका १३) विवि यिंग-यिंग डुआन (चीन) ६-१, ६-०. गार्बीन मुगुरुझा (स्पेन ७) विवि अनास्ताशिया सेवात्सोवा (लॅट्‌विया ३२) ६-४ ६-२. स्वेतलाना कुझ्नेत्सोवा (रशिया ८) विवि एलेना यांकोविच (सर्बिया) ६-४ ५-७ ९-७
पुरुष एकेरी ः स्टॅन वॉव्रींका (स्वित्झर्लंड ४) विवि व्हिक्‍टर ट्रॉयकी (सर्बिया २९) ३-६ ६-२ ६-२ ७-६ (७). रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड १७) विवि टोमास बर्डीच (चेक १०) ६-२ ६-४ ६-४. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा (फ्रान्स १२) विवि जॅक सॉक (अमेरिका २३) ७-६ (४) ७-५ ६-७ (८) ६-३. केई निशीकोरी (जपान ५) विवि ल्यूकास लॅको (स्लोव्हाकिया) ६-४ ६-४ ६-४. अँडी मरे (ब्रिटन १) विवि सॅम क्‍यूरी (अमेरिका ३१) ६-४ ६-२ ६-४. डॅन इव्हान्स (ब्रिटन) विवि बर्नार्ड टॉमीच (ऑस्ट्रेलिया २७) ७-५ ७-६ (२) ७-६ (३). मिशा झ्वेरेव (जर्मनी) विवि मॅलेक जझिरी (ट्युनिशिया) ६-१ ४-६ ६-३ ६-०.

समालोचकाची हकालपट्टी
व्हिनसच्या खेळाविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल इएसपीएनचे समालोचक डग ॲड्‌लर यांची हकालपट्टी झाली. त्यांनी गोरिला म्हणजे माकड अशी टिप्पणी केली. वास्तविक आपण गुरीला असा शब्द म्हणाल्याचा दावा त्यांनी केला. त्याचा अर्थ म्हणजे गनिमी कावा असा होतो. वाहिनीने याची तातडीने गंभीर दखल घेत त्यांची हकालपट्टी केली. त्यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली. व्हिनसने मात्र यावर थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मला जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते, इतकेच ती म्हणाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian Open 2017