युकीचे फोरहॅंड, रामचे बॅकहॅंड धडाडले 

मुकुंद पोतदार
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

माझी सुरवात चांगली झाली नाही; पण नंतर सामना पुढे सरकत गेला तशी मी एकाग्रता साधत गेलो. पुण्यात खेळताना मला आनंद मिळतो. मी येथे चॅलेंजर विजेतेपद मिळविले. प्रेक्षक मला चांगला पाठिंबा देतात. पुणे माझ्यासाठी लकी आहे, असे वाटते. 
- युकी भांब्री 

पुणे : युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांनी तीन सेटमध्येच विजय मिळवित डेव्हिस करंडक पुरुष सांघिक स्पर्धेत आशिया-ओशेनिया विभागाच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध भारताला 2-0 अशी कमाल आघाडी मिळवून दिली. युकीचे फोरहॅंड, तर रामचे बॅकहॅंड धडाकेबाज ठरले. 

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या एमएसएलटीए कोर्टवर यजमान खेळाडूंच्या विजयामुळे पुणेकर टेनिसप्रेमींना आनंदाची पर्वणी मिळाली. युकीने फिन टिअर्नीवर 6-4, 6-4, 6-3, तर रामने ज्योस स्टॅथमवर 6-3, 6-4, 6-3 अशी मात केली. 

देशासाठी कसून खेळ 
रामकुमारसाठी मोसमाची सुरवात चांगली झाली नव्हती. चेन्नई ओपनमध्ये त्याला युकीनेच हरविले होते. युकी स्वतः दुखापतीमुळे गेल्या वर्षी सुमारे निम्मा मोसम खेळू शकला नव्हता; पण या दोघांनी डेव्हिस करंडक लढतीत देशासाठी सर्वोत्तम खेळ करता यावा म्हणून जोरदार पूर्वतयारी केली. ड्रॉच्या आदल्या दिवशी दुहेरीचा जोडीदार निवडण्यावरून बरेच रामायण घडले होते; पण या दोघांनी या वादाचा आपल्या एकाग्रतेवर परिणाम होऊ दिला नाही. 

युकीकडून अपेक्षापूर्ती 
सलामीच्या एकेरीतील युकीचा विजय अपेक्षित होता. त्याने अपेक्षापूर्ती करीत पुणेकर टेनिसप्रेमींना जल्लोषाची संधी दिली. टॉप हंड्रेडमध्ये प्रवेश केल्यानंतर याच कोर्टवर तो चॅलेंजर स्पर्धेत खेळला. त्याने येथे विजेतेपदही मिळविले आहे. या हार्ड कोर्टवर त्याचा खेळ पुन्हा बहरला. 

सुदैवी नेटकॉर्ड 
ही लढत तीन तास 14 मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत युकीची 368व्या क्रमांकावर घसरण झाली असली तरी तो टॉप हंड्रेडमधील खेळाडू आहे, तर फिनचा सध्या 414वा क्रमांक आहे. 

युकीची सुरवात सुदैवी ठरली. पहिल्याच गुणाला नेट कॉर्डची साथ त्याला मिळाली. फिनच्या सर्व्हिसवर ही सुरवात सुदैवी होती. ब्रेकपॉइंटला फिनचा फटका जाळ्यात गेला आणि युकीला ब्रेक मिळाला. दुसऱ्या गेममध्ये मात्र युकीचे दोन फोरहॅंड बाहेर गेले, ब्रेकपॉइंटलासुद्धा हीच चूक झाल्यामुळे युकीची सर्व्हिस भेदली गेली. तिसऱ्या गेममध्ये फिनने सर्व्हिस राखली. चौथ्या गेममध्ये युकीचा डबल हॅंडेड बॅकहॅंड चुकला. सर्व्हिस खंडित होऊन तो 1-3 असा मागे पडला होता. पुढील गेममध्ये 15-40 पिछाडीवरून फिनला नेट कॉर्डचा फटका बसला; मग सर्व्हिस राखत युकीने 3-3 अशी बरोबरी साधली. युकी मग स्थिरावला. सातव्या गेममधील ब्रेकसह 4-3 अशी आघाडी घेत त्याने टॉप गिअर टाकल्याचे पुढील गेममध्ये दिसले. बिनतोड सर्व्हिस करीत त्याने हा गेम जिंकला. दहाव्या गेममध्ये तीन सेटपॉइंट मिळाल्यानंतर त्याची एक डबलफॉल्ट झाली; पण सर्व्हिस राखत त्याने आघाडी घेतली. 

दुसऱ्या सेटमध्ये ब्रेकची देवाणघेवाण सुरवातीलाच झाली. पाचव्या गेममधील ब्रेक युकीसाठी पुरेसा ठरला. तिसऱ्या सेटमध्ये त्याने पाचव्या आणि नवव्या गेममध्ये ब्रेक नोंदविले. 

रामकुमारचा धडाका 
रामकुमारच्या 276व्या क्रमांकाच्या तुलनेत स्टॅथम 417वा आहे. रामकुमारने पहिल्या सेटच्या चौथ्या, दुसऱ्यात सातव्या, तर तिसऱ्यात पाचव्या व नवव्यात ब्रेक मिळविला. रामकुमारने एक तास 52 मिनिटांत विजय नोंदविला. भक्कम सर्व्हिस करीत त्याने स्टॅथमला संधी दिली नाही. 

टेनिससाठी अत्यंत आदर्श वातावरण होते. भारतीय खेळाडूंनी आमच्यावर सतत दडपण ठेवले. त्यांनी कमी चुका केल्या, तसेच महत्त्वाच्या गुणांना सरस खेळ केला. 
- ऍलिस्टर हंट, न्यूझीलंडचे कर्णधार 

दुसरा सामना खडतर ठरेल असे वाटले होते; पण रामची सर्व्हिस भक्कम झाली. त्याने पूर्वनियोजित डावपेचांनुसार खेळ केला. पाच सेटचा सामना खडतर असतो. अशावेळी तीन सेटपर्यंत एकाग्रता राखणे अवघड असते. त्यात आपले दोन्ही खेळाडू यशस्वी ठरले. लढतीपूर्वी खूप काही घडले म्हणून त्यांना प्रेरित करण्यासाठी मला खास काही करावे लागले नाही. त्यांना देशासाठी खेळण्याकरिता वेगळ्या प्रेरणेची गरज नाही. 
- आनंद अमृतराज, भारतीय कर्णधार 

माझी सुरवात चांगली झाली नाही; पण नंतर सामना पुढे सरकत गेला तशी मी एकाग्रता साधत गेलो. पुण्यात खेळताना मला आनंद मिळतो. मी येथे चॅलेंजर विजेतेपद मिळविले. प्रेक्षक मला चांगला पाठिंबा देतात. पुणे माझ्यासाठी लकी आहे, असे वाटते. 
- युकी भांब्री 

मोसमासाठी माझा प्रारंभ चांगला झाला नाही; पण या लढतीपूर्वी 15 दिवस मी अमेरिकेत होतो. तेथे मी स्पेनचे प्रशिक्षक एमिलीओ सॅंचेझ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. मी येथे रविवारी आलो. राखीव खेळाडूंनीसुद्धा सरावात चांगली साथ दिली. 
- रामकुमार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Davis Cup Tennis India versus New Zealand Ramkumar Ramanathan Yuki Bhambri