रामानाथनच्या विजयाने आघाडी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 April 2017

उझबेकिस्तानच्या तेमूर इस्माईलोववर मात
बंगळूर -  आशिया ओशियाना गटातील दुसऱ्या फेरीच्या लढतीत शुक्रवारी रामकुमार रामानाथन याने एकेरीची पहिली लढत जिंकून उझबेकिस्तानविरुद्ध भारताला आघाडी मिळवून दिली.

उझबेकिस्तानच्या तेमूर इस्माईलोववर मात
बंगळूर -  आशिया ओशियाना गटातील दुसऱ्या फेरीच्या लढतीत शुक्रवारी रामकुमार रामानाथन याने एकेरीची पहिली लढत जिंकून उझबेकिस्तानविरुद्ध भारताला आघाडी मिळवून दिली.

एकेरीच्या पहिल्या लढतीत त्याने तेमूर इस्माईलोव याचा प्रतिकार चार सेटच्या लढतीत 6-2, 5-7, 6-2, 7-5 असा मोडून काढला. ही लढत 3 तास 14 मिनिटे चालली.

रामानाथनने पहिल्या सेटमध्ये धडाकेबाज सुरवात केली. इस्माईलोवची सर्व्हिस तिसऱ्या आणि पाचव्या गेमला ब्रेक करत त्याने 4-1 अशी मोठी आघाडी मिळविली. सहाव्या गेमला रामानाथनला आपली सर्व्हिस राखण्यासाठी धडपडावे लागले. त्यानंतर आठव्या गेमला रामानाथन याने ब्रेक पॉइंट वाचवत पहिला सेट जिंकला.

दुसरा सेट काहीसा लांबला. इस्माईलोव याने हा सेट जिंकून उझबेकिस्तानचे आव्हान राखले. बाराव्या गेमला त्याने ब्रेकची संधी साधत सेट टायब्रेकमध्ये जाण्यापासून रोखला आणि विजय मिळविला. रामानाथनला या सेटमध्ये त्याच्या सर्व्हिसने दगा दिला. त्याला 4-3 अशा आघाडीनंतर सेट गमवावा लागला. आठवी गेम गमावताना त्याच्याकडून तीन डबल फॉल्ट झाले. त्यातच बॅकहॅंड फटक्‍याचा अंदाज चुकल्याने त्याने सर्व्हिस गमावली. त्यानंतर त्याला ब्रेकची संधीही साधता आली नाही. इस्माईलोव याने 6-5 आघाडीनंतर दुसरा सेट आपली सर्व्हिस राखत 7-5 असा जिंकला. पहिल्या दोन सेटमधील 1 तास 51 मिनिटांच्या खेळात रामानाथनला त्याच्या सर्व्हिसने चांगलाच दगा दिला. त्याच्याकडून तब्बल 10 डबल फॉल्ट झाले.

इस्माईलोव याने उझबेकिस्तानला बरोबरी साधून दिल्यानंतरही रामानाथनचा सामना करताना त्याला अडचणी येत होत्या. तिसऱ्या सेटमधील 2-2 अशा बरोबरीच्या स्थितीत उजव्या मांडीत क्रॅम्प आल्याने इस्माईलोवच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्याचा फायदा घेत रामानाथनने त्याची सर्व्हिस भेदत 3-2 अशी आघाडी घेतली. तेच सातत्य राखत सातव्या गेमला पुन्हा एकदा सर्व्हिस भेदत रामानाथनने तिसरा सेट जिंकून पुन्हा आघाडी मिळवली.

चौथा सेट अपेक्षितपणे चुरशीचा झाला. वेदना होत असूनही इस्माईलोवचा प्रतिकार जबरदस्त होता. रामानाथनही त्याला प्रतिउत्तर देत होता. त्यामुळे अकराव्या गेमपर्यंत कुणीच सर्व्हिस भेदू शकले नाहीत. बाराव्या गेमला विजयी सर्व्हिस करताना रामनाथन अचानक दडपणाखाली वाटला. त्याच्याकडून मॅच पॉइंटला डबल फॉल्ट झाला. अर्थात, त्याने लगेच दुसरा मॅच पॉइंट मिळवला. हादेखील त्याने डबल फॉल्ट करून गमावला. दोन मॅच पॉइंट वाचवल्याचा फायदा घेण्यात इस्माईलोवदेखील अपयशी ठरला. रामानाथन याने तिसरा मॅच पॉइंट मात्र सार्थकी लावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devis karandak second round wwin by ramanathan