डेव्हिस लढतीसाठी पेस-बोपण्णाची मोट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 March 2017

अंतिम निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे सांगत भूपतीचे "नाट्य' शिल्लक असल्याचे संकेत
मुंबई/नवी दिल्ली - अखिल भारतीय टेनिस संघटनेने डेव्हिस करंडक लढतीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णाची मोट बांधली आहे. चार जणांच्या संघात दुहेरीचे दोन खेळाडू निवडत एकेरीचा खेळाडू ऐनवेळी जखमी झाल्यास पर्याय नसेल, हेही विचारात घेतले नाही.

अंतिम निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे सांगत भूपतीचे "नाट्य' शिल्लक असल्याचे संकेत
मुंबई/नवी दिल्ली - अखिल भारतीय टेनिस संघटनेने डेव्हिस करंडक लढतीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णाची मोट बांधली आहे. चार जणांच्या संघात दुहेरीचे दोन खेळाडू निवडत एकेरीचा खेळाडू ऐनवेळी जखमी झाल्यास पर्याय नसेल, हेही विचारात घेतले नाही.

निवड समितीने सध्या युकी भांब्री, रामकुमार रामनाथन, प्रज्ञेश गुणेश्वरन, श्रीराम बालाजी, पेस आणि बोपण्णाची निवड केली आहे. ही निवड एप्रिलमधील लढतीसाठी आहे. अंतिम चौघांची निवड आगामी तीन आठवड्यांतील कामगिरी; तसेच तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे सांगत संघनिवडीच्या रॅलीज अजून शिल्लक आहेत, असे स्पष्ट संकेत न खेळणारे कर्णधार महेश भूपतीने दिले.

पेस हा जागतिक क्रमवारीनुसार भारतातील सध्याचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्तम टेनिसपटू आहे; पण संघटना पेसच्या ऐतिहासिक यशालाच अजून महत्त्व देत आहे. उझबेकिस्तान संघात डेनिस इस्तोमीन असेल. त्याच्या दोन्ही एकेरीच्या लढती नक्कीच जिंकणार. त्याने नुकतेच नोव्हाक जोकोविचला हरवले आहे. या परिस्थितीत दुहेरीची लढत निर्णायक ठरेल. त्यामुळे पेस-बोपण्णा या भारतातील सर्वोत्तम जोडीला खेळवण्याचे आम्ही ठरवले आहे, असे निवड समितीचे अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी सांगितले. इस्टोमिनने तीनही लढती जिंकल्यामुळे उझबेकिस्तानने दक्षिण कोरियास पराजित केले होते.

भूपतीला त्याच्यासमोरील खडतर आव्हानाची जाणीव आहे. त्यामुळेच त्याने भारतातील उपलब्ध सर्वोत्तम खेळाडूंची निवड झाल्याचे सांगितले; पण त्याचवेळी या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत खेळाडू; तसेच टेनिस संघटनेचा पाठिंबा लाभेल, ही अपेक्षाही व्यक्त केली. पेसबाबतचा निर्णय भूपतीसाठी महत्त्वाचा असेल. तो डेव्हिस करंडकातील दुहेरीतील सलग दोन लढतींत पराजित झाला आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी बोपण्णाने आपण पेसबरोबर नाइलाजास्तव खेळत असल्याचे सांगितले होते.

अर्थात, एकेरी तसेच दुहेरी लढती खेळू शकणारा साकेत मायनेनी अद्याप तंदुरुस्त नसल्यामुळे पेस-बोपण्णास पसंती देण्यात आली असावी, असेही मानले जात आहे. पेसने 43 विजयाचा विक्रम केल्यावर त्याला निरोप देण्यात येईल, अशीच चिन्हे आहेत.

नोवाक जोकोविचला हरवलेला डेनिस इस्तोमीन प्रतिस्पर्धी संघात आहे. त्यामुळे दुहेरीसाठी पेस आणि बोपण्णा हे देशातील सर्वोत्तम दुहेरीचे खेळाडूच हवेत.
- एस. पी. मिश्रा, निवड समितीचे अध्यक्ष.

लढतीसाठी अंतिम संघाची निवड ही खेळाडूंची आगामी आठवड्यातील कामगिरी; तसेच तंदुरुस्तीवरच अवलंबून असेल.
- महेश भूपती, न खेळणारे कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devis karandak tennis competition