esakal | ॲनेटचा पेट्रा क्विटोवाला धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

पॅरिस - इटलीच्या कॅमिला जॉर्जीविरुद्ध परतीचा फटका मारताना अमेरिकेची स्लोआनी स्टीफन्स.

ॲनेटचा पेट्रा क्विटोवाला धक्का

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस - पेट्रा क्विटोवाचे फ्रेंच ओपनमधील आव्हान तिसऱ्याच फेरीत आटोपले. ॲनेट काँटावेईटने तिला ७-६ (८-६), ७-६ (७-४) असे पराभूत केले. मारिया शारापोवा आणि गार्बीन मुगुरुझा यांनी झटपट विजय मिळविले.

पेट्राने क्‍ले कोर्टवर १३ सामने जिंकले होते. तिला आठवे मानांकन होते. इस्टोनियाच्या ॲनेटला २५वे मानांकन आहे. शारापोवाने सहाव्या मानांकित कॅरोलीना प्लीस्कोवाचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडविला. २८वे मानांकन असले, तरी शारापोवाने सरस खेळ केला. येथे दोन वेळा विजेती ठरलेली शारापोवा पुनरागमनानंतर रोलाँ गॅरोच्या सेंटर कोर्टवर प्रथमच खेळली. शारापोवाने १८ विनर्स मारले. तिने ५९ मिनिटांत सामना जिंकणे आश्‍चर्यकारक ठरले. याचे कारण आधीच्या फेऱ्यांत तिला रिचेस होगेनकॅंप आणि डॉना वेकिच अशा तुलनेने कमकुवत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध झगडावे लागले होते.

तृतीय मानांकित गार्बीन मुगुरुझाने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडविला. समंथाने २०१० मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या गेममध्ये समंथा केवळ दहा गुण जिंकू शकली. दुसऱ्या सेटमध्येही तिने पहिले दोन गेम गमावले होते. त्यानंतर तिने २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर मात्र मुगुरुझाने सलग चार गेम जिंकले.

अमेरिकन विजेत्या स्लोआनी स्टीफन्सने इटलीच्या कॅमिला जॉर्जीचे कडवे आव्हान ४-६, ६-१, ८-६ असे परतावून लावले. आधीच्या दोन फेऱ्यांत स्लोआनीने केवळ सहा गेम गमावले होते. ५७व्या क्रमांकावरील कॅमिलाने तिला झुंजविले.

नदाल, सिमोना विजयी
रॅफेल नदालने रिचर्ड गास्केला ६-३, ६-२, ६-२, तर सिमोना हालेपने अँड्रिया पेट्‌कोविच (जर्मनी) ७-५, ६-० असे हरविले.