वॉव्रींकाचे पुनरागमन अपयशी

स्टॅन वॉव्रींकाने धक्कादायक पराभवानंतर अनेक इमोजी ट्विट केल्या. त्यात हताश वॉव्रींकाने कसून सराव करण्याच्या जोरावर लवकर ‘टॉप’ वर जाण्याचा निर्धारही व्यक्त केला.
स्टॅन वॉव्रींकाने धक्कादायक पराभवानंतर अनेक इमोजी ट्विट केल्या. त्यात हताश वॉव्रींकाने कसून सराव करण्याच्या जोरावर लवकर ‘टॉप’ वर जाण्याचा निर्धारही व्यक्त केला.

पॅरिस - माजी विजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकाचे फ्रेंच ओपनमधील पुनरागमन फसले आहे. त्याला पहिल्याच फेरीत स्पेनच्या गुलेर्मो गाल्सिया-लोपेझ याने त्याला पाच सेटमध्ये ६-२, ३-६, ४-६, ७-६ (७-५), ६-३ असे हरविले.

वॉव्रींकाने २०१५ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या मोसमात त्याच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर तो पुनरागमन करीत आहे. त्याला २३वे मानांकन होते. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने पुढील दोन सेट जिंकले होते. त्यानंतर मात्र तो हरला.

जोकोविच विजयी
नोव्हाक जोकोविचने दुसरी फेरी गाठली. त्याने ब्राझीलच्या रॉजेरिओ डुट्रा-सिल्वा याला ६-२, ६-४, ६-४ असे हरविले. १३४व्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा विजय समाधानकारक असल्याचे त्याने सांगितले.

अझारेन्का पराभूत
खासगी आयुष्यातील समस्यांमुळे त्रस्त झालेल्या बेलारूसच्या व्हिक्‍टोरिया अझारेन्काच्या आशा संपुष्टात आल्या. चेक प्रजासत्ताकाच्या कॅटरीना सिनियाकोवाने तिला ७-५, ७-५ असे हरविले. मुलाच्या ताब्यावरून खटला लढवित असलेल्या व्हिक्‍टोरियाची मोसमातील ही पाचवीच स्पर्धा आहे. माद्रिदमध्ये ती दुसऱ्या, तर रोममध्ये पहिल्याच फेरीत हरली होती. अव्वल स्थानावरून तिची ८४व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे.

पेट्रा क्विटोवा आणि नाओमी ओसाका यांनी आगेकूच केली. आठव्या मानांकित क्विटोवाने व्हेरोनिका सेपेडे रॉयगचे आव्हान ३-६, ६-१, ७-५ असे परतावून लावले. माद्रिदमधील विजेतेपदामुळे पेट्राची संभाव्य विजेत्यांमध्ये गणना होत आहे. निर्णायक सेटच्या ११व्या गेममध्ये तिने ब्रेक मिळविला.
जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या सोफिया केनीनला ६-२, ७-५ असे हरविले. इंडियन वेल्समधील विजेतेपदासह ओसाकाने अपेक्षा उंचावल्या आहेत.

‘मीडिया’वर खापर
२२वे मानांकन असलेल्या ब्रिटनच्या योहाना काँटाला सलामीलाच कझाकिस्तानच्या युलिया पुतीनत्सेवाने ६-४, ६-३ असे हरविले. योहाना सलग चौथ्या वेळी रोलाँ गॅरोवर पहिल्याच फेरीत हरली. आधीच्या तीन वर्षांतील तिच्या खराब कामगिरीचा उल्लेख करून प्रसार माध्यमांनी फारशा आशा नसल्याचा उल्लेख केला होता. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून योहानाने अशा गोष्टींमुळे फारसा फायदा होत नसल्याचे स्पष्ट केले. युलिया ९३व्या स्थानावर असल्यामुळे योहानाचा पराभव निराशाजनक ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com