esakal | फेडररचा 68 मिनिटांत नदालवर विजय

बोलून बातमी शोधा

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - टेनिसची लढत सुरु असताना कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नदाल आणि फेडरर निकाल लागल्यानंतर एकमेकांशी औपचारीक हस्तांदोलन करण्याऐवजी भावपूर्ण अलिंगन देताना.
फेडररचा 68 मिनिटांत नदालवर विजय
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नोव्हाक जोकोविचला गारद केलेल्या किर्गीऑसशी लढत
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - रॉजर फेडररने बहुचर्चित लढतीत रॅफेल नदालला केवळ 68 मिनिटांत हरवून इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गीऑसचे आव्हान असेल. किर्गीऑसने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला गारद केले.

फेडररने चौथ्या फेरीत 6-2, 6-3 असा विजय संपादन केला. त्याने सलग तिसऱ्या सामन्यात नदालवर मात केली. त्याने तब्बल चार वेळा नदालची सर्व्हिस भेदली. 36 सामन्यांत फेडररचा हा तेरावाच विजय असला तरी त्याचे वर्चस्व अनपेक्षित ठरले. हा मुकाबला तीन सेटपर्यंत रंगण्याची अपेक्षा होती. फेडररने कारकिर्दीत प्रथमच नदालवर सलग तीन सामन्यांत मात केली.

भरगच्च स्टेडियमवर फेडररने सुरवातच धडाक्‍यात केली. पहिल्याच गेममध्ये त्याने नदालची सर्व्हिस भेदली. फेडररने त्याची सर्व्हिस भक्कम केली. संपूर्ण सामन्यात त्याला सर्व्हिसवर एकाच ब्रेकपॉइंटचा सामना करावा लागला. यातूनच त्याचे वर्चस्व अधोरेखित होते. त्याने मारलेले बॅकहॅंडचे फटकेही अप्रतिम होते. दुसऱ्या गेममध्ये नदालला ब्रेकपॉइंट मिळाला होता, पण तो संधी साधू शकला नाही. नंतर नदालने तीन वेळा "लव्ह'ने सर्व्हिस राखली, पण फेडररचे फटके अत्यंत अचूक होते. अनेक वेळा चेंडू बेसलाइनला स्पर्श करीत होता. फेडररने ड्रॉप शॉट मारतानासुद्धा चांगले टायमिंग साधले.

जोकोविचला धक्का
जोकोविचला किर्गीऑसने पुन्हा गारद केले. दोन मार्च रोजी त्याने मेक्‍सिकोतील ऍकॅपुल्को येथील स्पर्धेत ही कामगिरी केली होती. जोकोविचची या स्पर्धेतील 19 सामन्यांची यशोमालिका खंडित झाली. किर्गीऑस म्हणाला की, "माझा आधीचा विजय नशिबाचा भाग नव्हता हेच यातून दिसून आले. मी प्रत्येक गुणासाठी चुरशीने खेळ केला. उष्ण हवामानात आम्ही दोन तास खेळलो. प्रामाणिक प्रयत्नांतून मिळालेला हा विजय चांगला आहे.'

जोकोविचकडून 25 वेळा फटके चुकले. यात सर्व्हिसवरील फोरहॅंड रिटर्न दुसऱ्या मॅचपॉइंटला चुकला. जोकोविचने सांगितले की, "किर्गीऑस अनेकदा ताशी 140 मैल वेगाने सर्व्हिस करीत होता. अवघड कोनांमधून सर्व्हिस येत होती. अशावेळी योग्य ठिकाणी उभे राहण्यासाठी अंदाज बांधणे कठीण झाले होते.' किर्गीऑसने 14 बिनतोड सर्व्हिस केल्या. एका सर्व्हिसचा वेग ताशी 141 मैल होता. "फर्स्ट सर्व्ह'वर त्याने 86 टक्के गुण जिंकले.

इतर निकाल - स्टॅन वॉव्रींका विवि योशिहितो निशिओका 3-6, 6-3, 7-6 (7-4). केई निशिकोरी विवि डोनाल्ड यंग 6-2, 6-4. जॅक सॉक विवि मॅलेक जझिरी 4-6, 7-6 (7-1), 7-5. पाब्लो कॅर्रेनो बुस्टा विवि ड्यूसान लॅजोविच 6-4, 7-6 (7-5). पाब्लो क्‍युव्हास विवि डेव्हिड गॉफीन 6-3, 3-6, 6-3.

2004 नंतर प्रथमच
फेडरर आणि नदाल यांच्यात उपांत्यपूर्व फेरीच्या आधी लढत होण्याची ही 2004 नंतरची पहिलीच वेळ होती. तेव्हा मायामीतील स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत ते आमनेसामने आले होते. त्यानंतर प्रत्येक वेळी उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम फेरीत त्यांची लढत झाली होती. त्यांची लढत अंतिम फेरी नसण्याची ही एकूण पाचवीच वेळ होती.

मागील तीन सामन्यांत नदालविरुद्ध जिंकल्यामुळे छान वाटते. महत्त्वाचे म्हणजे मी ऑस्ट्रेलियन विजेतेपद मिळविले, जे माझ्यासाठी फार मोठे आहे.
- रॉजर फेडरर